निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये आपलं नशीब आजमावल्यानंतर करण जोहरने रेडिओ क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. ‘कॉलिंग करण’ या रेडिओ शोच्या पहिल्या पर्वात तो यशस्वीसुद्धा ठरला. या यशानंतर आता तो पुन्हा एकदा याच रेडिओ शोच्या दुसऱ्या पर्वासह श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. प्रेम, नाती, त्यात निर्माण होणारी तेढ आणि विकोपाला जाणारे वाद आणि त्यातून नात्यात निर्माण होणारं तणावाचं वातावरण या साऱ्यावर करण त्याच्या रेडिओ शोमधून भाष्य करतो, श्रोत्यांचे प्रश्न सोडवण्याचा, त्यांना सुयोग्य पर्याय, सल्ले देण्याचा प्रयत्न करतो.
प्रचंड लोकप्रिय अशा या रेडिओ शोच्या दुसऱ्या पर्वाच्या लाँचच्या निमित्ताने करण बोलत होता. त्यावेळी त्याने अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची गरज असते, याचा उलगडा केला. ‘माझ्यामते प्रेमभंग न झालेल्या कलाकारांना त्यांच्या अभिनयात काही अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुम्ही चांगले अभिनेचे किंवा अभिनेत्री आहात, तर तुमचा प्रेमभंग झालाच असेल. कारण, त्याशिवाय भावभावनांच्या ज्या छटा तुमच्या चेहऱ्यावर उमटतात त्या दिसणं निव्वळ अशक्यच आहे’, असं करण म्हणाला.
वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा
डोळ्यांच्या वाटे अनेकदा अर्ध्याहून अधिक अभिनय बरंच काही सांगून जातो. ज्यांच्या डोळ्यातूनही अभिनयाची भाषा तितक्याच प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचते ते या प्रेमभंगातून गेलेले असतात, असं म्हणत त्याने आपला वेगळा दृष्टीकोन मांडला. करणने मांडलेले हे विचार सर्वांनाच पटतील असं नाही. कारण, कलेकडे पाहण्याचा प्रत्येकाचाच वेगळा आणि तितकाच व्यापक दृष्टीकोन असतो हेसुद्धा नाकारता येणार नाही.