टेलिव्हिजन विश्वातील एक गाजलेली अभिनेत्री म्हणून दिव्यांका त्रिपाठी नावारुपास आली आहे. विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या मालिकांपैकी दिव्यांका महत्त्वाची भूमिका साकारत असणारी मालिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. असे असतानाच भारतीय टेलिव्हिजन जगतात दिव्यांका ही सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे असेही म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली तिची ‘ये है मोहोब्बते’ ही मालिका आजही अनेकांची दाद मिळवत आहे. दिव्यांकाची लोकप्रियता ही फक्त तिच्या ‘इशिमा’च्या भूमिकेपुरतीच मर्यादित नसून तिच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही ती नेहमीच चर्चेत असते.
मालिकेतील तिची सरळ आणि सालस भूमिका पाहता दिव्यांकाने अनेकांच्या मनात घर केले. पण नुकतेच एका फोटोशूटच्या निमित्ताने दिव्यांका तिची चौकटीतील प्रतिमा मोडित काढण्यासाठी सज्ज झाली होती अशी माहिती सूत्रांमार्फत मिळाली होती. एका नव्या रुपात दिव्यांकाला पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता होती. पण, सारे काही सुरळीत असताना एकाएकी दिव्यांकाने या फोटोशूटसाठी नकार दिल्याचे समोर आले आहे. एका प्रसिद्ध फॅशन ब्रँडच्या फोटोशूटसाठी हा सारा घाट घालण्यात आला होता आणि त्यासाठी दिव्यांका त्रिपाठीची वर्णीसुद्धा लागली होती.
दिव्यांकासुद्धा या फोटोशूटसाठी फार उत्सुक असल्याचे सूत्रांकडून कळत होते. पण दिव्यांकाने जेव्हा तिच्या पतीला या फोटोशूटमध्ये सहभागी करण्याची विचारणा केली आणि या कारभाराला गालबोट लागले. यासोबतच दिव्यांकाने तिचे मानधनही वाढवून मागितले होते. मानधनाची वाढ आणि पती विवेकला या फोटोशूटचा भाग करुन घेण्याचा हट्ट यांमुळे सध्यातरी हे प्रकरण ताटकळलेच आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिव्यांका सध्या तिच्या ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून काही महिन्यांपूर्वी ती सहकलाकार विवेक दाहियासोबत विवाहबंधनात अडकली होती. एका खाजगी सोहळ्यात हे दोघे विवाहबद्ध झाले होते.