रेश्मा राईकवार

काही विषय फार नवे नसले तरी त्यांचं अचानक समोर येणं नाही म्हटलं तरी नवलाचं ठरतं. अवघड जागेचं दुखणं हळुवारपणे उलगडत न्यावं असा काहीसा प्रकार असला तर तो आपल्यालाही थोडी मोकळेपणाची झुळूक देऊन जातो. असंच काहीसं आयुषमान खुराणाची मुख्य भूमिका असलेल्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाबाबत म्हणता येईल.

गेल्या कित्येक दिवसांत खास आयुषमान खुराणाच्या शैलीतला चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली नव्हती. करोनाकाळात आणि त्याआधी ज्या शैलीत सामाजिक मुद्दे मांडणारे हलकेफुलके चित्रपट त्याने केले होते ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर अभिनेता म्हणून त्याने स्वत:च्या शैलीत बदल म्हणून ‘अनेक’, ‘चंदीगढ करे आशिकी’सारखे प्रयोग केले. पण आशय-मांडणी चांगली असूनही ते चित्रपट फार काही चमक दाखवू शकले नव्हते. त्यामुळेच की काय बॉलीवूडचे सगळेच फॉम्र्युले दणकून आपटतायेत, त्यात राजकुमार राव आणि आयुषमान खुराणासारख्या अभिनेत्यांचे एका वेगळय़ा शैलीतील चित्रपटही अपयशी ठरत आहेत, अशी चर्चा एव्हाना बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे. या धर्तीवर फारशी कुठलीही पूर्वप्रसिद्धी न करता अचानक येऊन टपकावा तसा आलेला अनुभूती कश्यप दिग्दर्शित ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट आयुषमानच्या चाहत्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. चित्रपटाचा विषय हा आत्ताच्या काळाशी फार सुसंगत आहे, असं म्हणता येणार नाही. कारण कार्यक्षेत्रांच्या बाबतीत किमान काही पातळीवर स्त्री-पुरुष हा लिंगभेद फारसा परिणामकारक राहिलेला नाही, त्याचे धक्के अधूनमधून आणि काही ग्रामीण भागात आजही बसतात. त्यामुळे ‘डॉक्टर जी’ चित्रपटाचा विषय अगदीच कालबाह्य झाला आहे हे म्हणणंही धाष्र्टय़ाचं ठरेल.

 अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून यशस्वी होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या डॉ. उदय गुप्तावर काही कारणास्तव स्त्रीरोग विभागात शिक्षण घेण्याची वेळ येऊन ठेपते. विभाग कुठलाही असो सध्या मिळालेली वैद्यकीय महाविद्यालयातली जागा हातची जाऊ नये म्हणून मिळालेल्या विभागात थोडी कळ काढू.. मग अस्थिरोग शल्य विभागात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील, अशी मनाची तयारी करून तो सरकारी रुग्णालयातील स्त्री रोग विभागात पोहोचतो. मात्र यत्र तत्र स्त्रीचाच वावर आणि त्यांचीच मक्तेदारी असलेल्या या विश्वात आपण थोडा काळही तग धरू शकणार नाही, याची जाणीव उदयला होते. मन तिथे आणि तन इथे अशा अवस्थेत या विभागात काम करताना त्याची होणारी ससेहोलपट, इतर महिला डॉक्टरांचे त्याला मिळणारे सहकार्य, विभागाच्या मुख्य डॉक्टर नंदिनी यांची कडक तत्त्वं आणि शिस्त या सगळय़ात उदय अधिकच भंजाळून जातो. आपल्याकडे अनेक चांगले पुरुष स्त्री रोगतज्ज्ञ आहेत, त्यामुळे उदयची कुचंबणा हा विषय का, असा प्रश्न पडू शकतो. मात्र इथे दिग्दर्शिकेने मांडणीसाठी या विषयाचा आधार घेतला असला तरी तिचा खरा रोख हा पुरुषी अहंकाराकडे आहे. कामाच्या क्षेत्रापासून ते प्रेम, लैंगिक गरजा आणि जोडीदाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही या पुरुषी अहंकाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे अजूनही आपण स्त्रीला कसं स्वातंत्र्य देतो किंवा तिचं स्वातंत्र्य मान्य करतो हाच पवित्रा घेणाऱ्यांना आपण मुळात त्यांना समजूनच घेऊ शकत नाही याची जाणीवच होत नाही. इथे दिग्दर्शिकेसह तीन अन्य लेखकांच्या चौकडीने ही कथा फुलवताना आजच्या काळातील स्त्रीच्या दृष्टिकोनातून हे एरव्ही छोटे-छोटे वाटणारे मुद्दे चांगल्या आणि सहज पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे नायकाच्या तोंडी एक संवाद आहे. तो म्हणतो, माझी प्रेयसी कायम मला म्हणते की तुला मुली काय बोलतात हे ऐकूच येत नाही. हे ऐकू न येणं हाच उदयसारख्या तथाकथित उच्चशिक्षित, सभ्य तरुणांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे मूळ आहे.

पुरुष क्रिकेट खेळतात, मुली बॅडमिंटन खेळतात. स्त्रीरोग चिकित्सा हा महिलांचा विषय आहे, तिथे पुरुष काय करणार? असे अनेक भ्रम बाळगून असलेल्या उदयला ना त्याच्या व्यावसायिक क्षेत्रात सूर सापडत ना वैयक्तिक आयुष्यात अगदी आईलाही समजून घेणं त्याला जड जातं. अर्थात, हळूहळू त्याच्या मनातले हे गुंते सोडवणारे प्रसंग घडत जातात. त्याचा दृष्टिकोन बदलत जातो. पूर्वार्धात खूप सुंदर पद्धतीने जाणारा हा चित्रपट उत्तरार्धात नाटय़मय वळण घेतो. दरवेळी मनातले पूर्वग्रह निवळायला कुठल्या तरी नाटय़मय घटनेचीच गरज असते असं नाही. इतरांशी झालेल्या संवादातून, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा अनुभवातूनही माणूस बदलत जातोच की.. तरीही हिंदी चित्रपटांना काही ठरावीक फंडय़ांची गरज भासते. तोच फंडा आणि मग एकुणात झालेली तीच चौकटीतली मांडणी यामुळे आयुषमानचा ‘डॉक्टर जी’ पुन्हा आपली पकड गमावून बसतो. सुमीत सक्सेना, सौरभ भारत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यप या चौघांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली आहे. चौघांनी मिळून कथा लिहीत असताना एकच सूर पकडून ठेवणं तशी अवघड गोष्ट असते, मात्र इथे खूप चांगल्या प्रमाणात ही चौकडी यशस्वी ठरली आहे. तरी काही ठिकाणी ओळखीच्या साच्यात गोष्ट फिरवण्याचा हट्ट, विनोदाचा अति तडका यामुळे अधिक खोलात जाऊन विषय मांडण्याची क्षमता असलेला हा चित्रपट तेवढय़ापुरते समाधान देऊन जातो.

 आयुषमानने साकारलेली भूमिका ही त्याच्या नेहमीच्या सहजशैलीतील आहे. रकुल प्रीत सिंगची डॉ. फातेमा, शेफाली शाह यांची डॉ. नंदिनी यांच्यासह डॉ. जेनी, डॉ. केएलपीडी, सुनीता अशा कितीतरी उत्तम स्त्री व्यक्तिरेखा चित्रपटात आहेत. मात्र त्यांच्याशी संबंधित विषयावर बोलणारा हा चित्रपट असूनही त्यांना फार काही ठोस देता आलेलं नाही. त्यातल्या त्यात शेफाली शाह आणि आयुषमानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या शीबा चढ्ढांसारख्या अनुभवी अभिनेत्रींनी आपल्या वाटय़ाला आलेल्या छोटेखानी भूमिकेतूनही आपला तडका दाखवून दिला आहे. अभिनयाच्या बाबतीत चित्रपट वरचढ आहे. आणि एरवीच्या बॉलीवूडी प्रेमकथा-देमार चित्रपटांपेक्षा या ‘डॉक्टर जीं’च्या उपचाराने थोडा गुण येईल.

‘डॉक्टर जी’

दिग्दर्शक – अनुभूती कश्यप

कलाकार – आयुषमान खुराणा, रकुल प्रीत सिंग, शेफाली शाह, शीबा चढ्ढा, अभय मिश्रा, प्रियम साहा, श्रद्धा जैन, आयेशा कडुस्कर.