१८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीत केलंय आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या जोडीने. खास बात म्हणजे या गाण्याचे शब्द आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत. लहानपणापासूनच आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या या दोन्ही भावांकडे जेव्हा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी विचारणा झाली तेव्हा दोघांनीही या गाण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. महामानवाचे विचार शीर्षकगीतातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आव्हानात्मक होतं. आदर्श आणि उत्कर्षने या गाण्यावर बराच अभ्यास आणि वाचन करुन शब्द लिहिले. मालिकेचं टायटल ट्रॅक लिहिण्याची दोघांचीही ही पहिलीचं वेळ आहे.

या नव्या अनुभवाविषयी सांगताना आदर्श शिंदे म्हणाला, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मालिका येणं आणि त्याचं शीर्षकगीत करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी प्रवास आहे. स्टार प्रवाहने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. या शीर्षकगीतातून बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि हे गाणं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवेल याची मला खात्री आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका
मोडल्या रूढी -त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना
भीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया’… असे या शीर्षकगीताचे शब्द असून आदर्श- उत्कर्षनेच या गाण्याला संगीत दिलंय. आदर्शच्या भारदस्त आवाजात नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं. १८ मे पासून म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत सागर देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार असून बाबासाहेबांचा बालपणापासूनचा प्रवास पाहायला मिळेल. महामानवाची गौरवगाथा १८ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.