scorecardresearch

नाटकात रमणारी ‘निर्मिती’

ज्योतिर्विद वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांची पहिली निर्मिती असलेला ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात बारा कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या  होत्या, ज्यात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचीही प्रमुख भूमिका होती.

man3 nirmiti sawant

रसिका शिंदे

प्रत्येक सामान्य माणसाची चिडचिड झाली की एक वाक्य त्याच्या तोंडातून येतेच ते म्हणजे हा ‘माझ्याच राशीला का आला आहे ?’, याच वाक्यावर आधारित अर्थात राशींवर आधारित ‘आलंय माझ्या राशीला’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. ज्योतिर्विद वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांची पहिली निर्मिती असलेला ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात बारा कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या  होत्या, ज्यात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचीही प्रमुख भूमिका होती. ‘झिम्मा’ चित्रपटातील त्यांची भूमिकाही गाजली आणि आता तर ‘झिम्मा २’चे बिगूलही वाजले आहे. मात्र चित्रपटांपेक्षा आपण नाटकात जास्त रमतो, असं निर्मिती सावंत सांगतात.

करोनाकाळात मनोरंजनसृष्टी पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर पुन्हा मनोरंजन क्षेत्राचे काम त्याच धडाडीने सुरू झाले ही सुखदायी बाब होती. त्यामुळे अनेक कलाकारांनी एकाचवेळी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली,  मात्र नाटक करताना इतर कोणतेही काम करणे कलाकारांना अवघड जाते, असे निर्मिती म्हणतात. ‘मी स्वत: नाटकांना पहिले प्राधान्य देते, कारण चित्रपट करणे त्या मानाने सोप्पे असते. मराठी चित्रपटांचे चित्रीकरण जास्तीत जास्त ३० दिवसांचे असते. त्यामुळे एखादा चित्रपट करणे तसे सोप्पे जाते. मालिका करणे मात्र अवघड असते. कारण काही वर्ष ती मालिका सुरू राहणार असते. त्यामुळे चित्रीकरणाचे दिवस वाढतात. आणि त्यावेळी नाटक करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे मी एकावेळी जबाबदाऱ्या घेत नाही. जर मी नाटक करत असेन तर केवळ नाटकांनाच प्राधान्य देते, कारण नाटकांमध्ये मी रमते’, असे त्यांनी सांगितले.  करोनाकाळानंतर आलेल्या नाटकांना प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला असे सांगत त्यांनी प्रेक्षकांचेही आभार मानले.

मराठी मनोरंजनसृष्टीतील महत्त्वाचे नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ.  त्यांच्यासोबत एकदा तरी काम करायला मिळावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. आणि ती इच्छा अनेक चित्रपटांतून पूर्ण झालीच आहे, पण ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकातूनही त्यांच्यासोबत रंगभूमीवर काम करायला मिळाले याचा अनुभव शब्दांत सांगता येण्यासारखा नाही, असे निर्मिती सांगतात. ‘नाटक किंवा चित्रपटांच्या सेटवर मी तशी कडक शिस्तीची असते, पण माझ्याहून अशोकमामा शिस्तीचे आहेत हे समजल्यावर तर काम करताना अजूनच धमाल आली. अशोकमामांनी चित्रपसृष्टीला काय दिले आहे याचे आपण सगळेच जण साक्षीदार आहोत. आणि इतका मोठा कलाकार जर शिस्तीने काम करत असेल तर आपोआपच सेटवरील कलाकारही त्या वर्तुळात सामावले जातात’, अशा शब्दांत त्यांनी मामांबरोबर काम करतानाच्या आठवणी सांगितल्या. तसेच, प्रत्येक नाटक स्वीकारताना आधी एक सामान्य प्रेक्षक म्हणून ते नाटक ऐकते. आणि जर मला ते प्रेक्षक म्हणून आवडले, तरच मी त्या नाटकाला किंवा चित्रपटाला होकार देते, असे निर्मिती सावंत त्यांच्या प्रत्येक चित्रपट अथवा नाटकांच्या निवडीबद्दल सांगतात. त्यामुळे नाटक हा एक जिव्हाळय़ाचा विषय आहे आणि तिथे रंगभूमीवर रिटेकचा पर्याय नसतो. समोर बसलेल्या प्रेक्षकांना तुमचा अभिनय हा आवडलाच पाहिजे याचा विचार करूनच मी रंगभूमीवर काम करते, असेही त्यांनी सांगितले. 

बऱ्याचदा असं होतं एकाच क्षेत्रात काम करत असताना अनेक वर्ष काही कलाकार एकत्र पडद्यावर काम करताना दिसत नाहीत. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत. या दोघीही ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात एकत्र भूमिकेत होत्या. याबद्दल अलका कुबल म्हणतात, ‘निर्मिती सावंत म्हणजे माझ्या वहिनींसोबत मी आत्तापर्यंत कधीच काम केलं नव्हतं. पण या चित्रपटाचा आम्ही दोघीही एक भाग आहोत याचा आनंद आहे. गेली अनेक वर्ष जे कुणी करू शकलं नाही तो आनंद पिंपळकर यांच्या या चित्रपटाने दिला आणि आम्हाला एका चित्रपटाचा भाग बनवलं. याआधी निर्मिती सावंत यांचे पती निर्माते महेश सावंत यांच्या ‘आपलं माणूस’ या नाटकात मी काम केलं होतं. त्यावेळी निर्मिती सावंत या क्षेत्रात काम करत नव्हत्या. पण निर्मात्या म्हणून त्या भेटायला यायच्या आणि त्यामुळे आमचं वैयक्तिक नातं घट्ट होत गेलं’, अशा आठवणींत अलका कुबल रमल्या. तर दिग्दर्शकांनी आम्हाला दोघींना चित्रपटाची संधी द्यावी. अलका कुबल यांच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. अनेक वर्षांची मैत्री मोठय़ा पडद्यावरही प्रेक्षकांसमोर आणायला आम्हाला आवडेल, असा विश्वास निर्मिती यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 00:02 IST