पंढरपूर नाटय़संमेलन
पंढरपूर येथे ९४ वे अ. भा. मराठी नाटय़संमेलन नुकतेच संपन्न झाले. दरवर्षीच्या उत्सवी संमेलनांपेक्षा हे संमेलन काही अंशी वेगळं ठरलं. त्याचं पहिलं कारण म्हणजे संमेलनाध्यक्ष अरुण काकडे! गेली सहा दशके ते अथक रंगकार्य करीत असले तरी त्यांच्या नावामागे कुठलंही वलय नाही. प्रायोगिक-समांतर रंगभूमीचे निष्ठावान पाईक हीच त्यांची खरी ओळख. नाटय़संमेलनाचं आयोजन करणारी अ. भा. मराठी नाटय़ परिषद ही संस्था व्यावसायिक रंगभूमीचंच बहुश: प्रतिनिधित्व करत असल्याने ‘काकडेकाका’ कधीकाळी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष होतील अशी सुतराम शक्यता नव्हती. तशात नाटककार, दिग्दर्शक आणि कलावंतांच्या भोवती जसे प्रसिद्धीचे झगमगाटी तेजोवलय असते, ते काकांकडे नसल्याने त्यांच्या नावाचा आग्रह कुणी धरण्याची शक्यताही धूसर होती. परंतु तरी हे अघटित घडलं. मागील दोन वर्षे विनय आपटे आणि मंडळींनी अमोल पालेकर आणि डॉ. मोहन आगाशे यांना नाटय़संमेलनाच्या व्यासपीठावर सन्मानाने विराजमान केल्यावर नव्याने नाटय़ परिषदेची धुरा हाती घेतलेल्या मोहन जोशी यांना आपणही प्रायोगिक-समांतरवाल्यांच्या विरोधात नाही, हे दाखवून देणं भाग होतं. त्यासाठी त्यांनी अचूक निशाणा साधला तो काकडेकाकांचा! याउप्पर प्रायोगिक-समांतरवाले त्यांच्या विरोधात ब्रही काढू शकणार नाहीत याची तजवीज त्यांनी एका फटक्यात करून टाकली आहे. असो. कशा हेतूने का होईना, काकडेकाका संमेलनाध्यक्ष झाले याचा (विशेषत:) प्रायोगिकांना आनंद झाल्यास नवल नाही. त्याचीच परिणती म्हणजे संमेलनाकडे नेहमी पाठ फिरवणाऱ्या कलावंतांनी यंदा काकांबद्दलच्या आत्मीयतेमुळे या संमेलनात प्रथमच पायधूळ झाडली. अर्थात् नाटय़ परिषदेनेही तीन महिने आधी त्यांना संमेलनाचे आवतन धाडून आग्रहाचं निमंत्रण दिलेलं होतंच.
या संमेलनात पूर्वी कधीही दिसलं नाही असं एक आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळालं. आजवर नाटय़संमेलनाध्यक्षांना भेटण्यासाठी त्यांच्या नावाभोवतीच्या ग्लॅमरमुळे गर्दी होत असे. परंतु यावर्षी काकडेकाकांना मळक्या कपडय़ांतले, अनवाणी, भुकेकंगाल वाटावेत असे अनेक स्थानिक कलाकार आवर्जून भेटत होते. आपल्या अडीअडचणी त्यांच्या कानी घालत होते. जमलंच तर नाटय़ परिषदेच्या उपक्रमांतून आपल्याला सामावून घ्यावं म्हणून त्यांना साकडं घालीत होते. काकडेकाकाही त्यांना शक्य होईल ते करण्याचं आश्वासन देत होते. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवीत होते. त्या गरीब बापडय़ा कलावंतांना पुढच्या संघर्षांसाठी एवढं बळही पुरेसं होतं. काकडेकाकांचं अध्यक्षीय भाषण मात्र काहीसं निराश करणारं होतं. एकतर त्यात असंख्य चुका होत्या. छापण्यापूर्वी त्याचं नीट संपादनही झालेलं नव्हतं. भाषणाच्या सुरुवातीला नाटय़ परिषदेबरोबरच्या संघर्षांसंबंधात त्यांनी मांडलेली भूमिका त्यांच्या नेहमीच्या समन्वयवादी धोरणाशी सुसंगतच होती. मात्र, त्यानंतर रंगभूमीच्या प्रत्येक घटकाबाबत भाष्य करण्याच्या नादात त्यांचं भाषण भरकटलं. अध्यक्षीय भाषणात रंगभूमीच्या सर्व घटकांची माहिती घेऊन त्यावर भाष्य करण्याचा त्यांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरीही अशा तऱ्हेनं वरवरच्या माहितीवर आधारीत भाष्य तितपतच उथळ राहतं, हेही तितकंच खरं. त्यापेक्षा त्यांचं ज्या समांतर, प्रायोगिक व बालरंगभूमीच्या क्षेत्रात काम आहे, त्यासंबंधात ते विस्ताराने बोलते तर अधिक काही हाती लागलं असतं. परंतु विविध रंगप्रवाहांच्या आर्थिक व अन्य अडचणींचा पाढा वाचण्यातच त्यांनी धन्यता मानली. खरं तर या प्रवाहांतल्या सद्य:स्थितीचं परखड विश्लेषण त्यांच्याकडून अपेक्षित होतं. मात्र, एका सामान्य कार्यकर्त्यांचं मनोगत असंच त्यांच्या भाषणाचं एकुणात स्वरूप होतं.
यंदाच्या संमेलनाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सर्वसाधारणत: संमेलनाचं अविभाज्य अंग असणाऱ्या परिसंवादांना यावेळी पूर्णपणे दिलेला फाटा! त्याऐवजी ‘अभिरूप न्यायालय’ नामक एक थातुरमातुर कार्यक्रम सादर झाला. त्यालाही अखेर परिसंवादाचंच स्वरूप आलं, ते सोडा. संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांची प्रकट मुलाखत आणि त्यांच्याशी स्थानिक कलाकारांचा संवाद हा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रंगलेला कार्यक्रम. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी या कार्यक्रमात, प्रायोगिकवाल्यांनी नाटय़संकुलात आपल्याला हक्काची जागी मिळावी म्हणून १४ जून २००७ रोजी केलेल्या आंदोलनात आपण कसे निर्दोष होतो आणि आंदोलनकर्ते कसे चुकीचे होते, हे दर्शविण्याचा साळसूद प्रयत्न केला. परंतु काकडेकाकांनी त्यांना संयतपणे, परंतु ठामपणे तिथल्या तिथं उत्तर देऊन त्यांची चूक त्यांच्या पदरात घातली. ‘नाटय़ परिषदेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे आणि सगळे मार्ग खुंटल्यावरच नाइलाजानं आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला,’ हे त्यांनी स्पष्ट केलं. तथापि, यासंदर्भात आपण पहिल्यापासून समन्वयवादी होतो आणि आहोत, हेही सांगायला ते विसरले नाहीत. स्थानिक कलावंतांबरोबरचा त्यांचा ‘संवाद’ही चांगलाच रंगला.
या संमेलनाची फलनिष्पत्ती काय, असं विचारलं तर त्यासाठी मात्र तिसरीकडेच बोट दाखवावं लागेल. राजकारण्यांचं सांस्कृतिक व्यासपीठांवर काय काम, असा सवाल नेहमीच केला जातो. परंतु पंढरपूर संमेलनात राजकारण्यांनी आपापसात एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याबरोबरच दोन-तीन चांगल्या गोष्टीही केल्या. मुंबईत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, त्यात चित्रपट आणि नाटय़ विद्यापीठ स्थापन करण्याचे सरकारने ठरवले असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात घोषित केले. हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांना फिल्मसिटीत त्यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स’ या चित्रपट प्रशिक्षण संस्थेसाठी दिलेली जमीन बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे आता त्या ठिकाणी नव्याने काहीतरी करणे सरकारला भाग आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर सर्वसंबंधितांशी चर्चा, विचारविनिमय सुरू आहे. याच विचारविनिमय प्रक्रियेत दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी फिल्मसिटीत सर्व सोयींनी युक्त अशा चित्रपट विद्यापीठाबरोबरच स्वतंत्र नाटय़ विद्यापीठही सुरू करण्यात यावे अशी सूचना केली होती. चित्रपट व नाटय़कलेसाठीचे अशा तऱ्हेचे स्वतंत्र विद्यापीठ जगभरात कुठेही नाही. जगातील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत ते व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा असा जोरदार आग्रह त्यांनी धरला होता. त्याचबरोबर मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवही आयोजित केला जावा अशीही मागणी त्यांनी केली होती. मराठी रंगभूमी ही आधुनिक रंगभूमी असल्याची टिमकी आपण कितीही मिरवीत असलो तरीही जागतिक रंगभूमीच्या परिप्रेक्ष्यात आपण नेमके कुठे आहोत, हे जाणून व समजून घ्यायचं असेल आणि जागतिक पातळीवरील रंगकार्याशी आपल्याला जोडून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव दरवर्षी भरविणे गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. केरळमध्ये नुकताच (२६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत) अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव पार पडला. केरळसारखं छोटं राज्यही असा नाटय़महोत्सव भरवू शकते, तर महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्याला- आणि जिथे मराठीसह विविधभाषिक रंगभूमी सतत क्रियाशील आहे अशा राज्याला हे का शक्य होऊ नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. प्रा. केंद्रे यांच्या या म्हणण्याची सकारात्मक दखल घेत मराठी भाषाविषयक खात्याचा कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री उदय सामंत यांनी अशा तऱ्हेचा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव पुढील वर्षीपासून भरविण्याचे सुतोवाच या संमेलनात स्वत:हूनच केले. संमेलनाच्या समारोप समारंभास उपस्थित असलेल्या अन्य मंत्र्यांनीही हा विचार आपल्या भाषणांत उचलून धरला आणि असा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव मुंबईत होण्याची गरज प्रतिपादित केली.
पंढरपूर संमेलनात केल्या गेलेल्या या दोन महत्त्वाच्या घोषणा पुढील काळात प्रत्यक्षात साकारल्या गेल्या तर संमेलनाचं याहून दुसरं मोठं फलित आणखीन काय असू शकेल?
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2014 रोजी प्रकाशित
नाटय़विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव, इत्यादी..
पंढरपूर येथे ९४ वे अ. भा. मराठी नाटय़संमेलन नुकतेच संपन्न झाले. दरवर्षीच्या उत्सवी संमेलनांपेक्षा हे संमेलन काही अंशी वेगळं ठरलं. त्याचं पहिलं कारण म्हणजे संमेलनाध्यक्ष अरुण काकडे! गेली सहा दशके ते अथक रंगकार्य करीत असले तरी त्यांच्या नावामागे कुठलंही वलय नाही
First published on: 09-02-2014 at 12:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama university international drama festival and etc