अगदी काल परवाची गोष्ट आहे. पॉपस्टार केटी पेरीने ट्विटरवर १०० दशलक्ष फॉलोअर्स गोळा करून समाजमाध्यमांच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. सध्या समाजमाध्यमांत जास्तीत जास्त चाहते गोळा करण्याचा ट्रेंड कलाकारांमध्ये रुजलेला आहे. जस्टिन बिबर, रिहाना, किम कदार्शियन, जस्टिन टिम्बरलेक यांसारखी अनेक सेलिब्रिटी यामुळे चर्चेत असताना एड शीरन या सध्याच्या लोकप्रिय गायकाने मात्र ट्विटर आदी समाजमाध्यमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. एड शीरन या ब्रिटिश गायकाने नुकतेच आपले ट्विटर अकाऊंट बंद केले असून तरुणांना या मोहजालापासून दूर राहण्याची विनंती केली आहे. त्याच्या मते लोकांना आपले विचार सहज बेधडकपणे मांडता यावेत या चांगल्या हेतूने समाजमाध्यमांचा शोध लागला होता. परंतु अनेक चांगल्या गोष्टींचा जसा गैरफायदा घेतला जातो त्याचप्रमाणे याचाही गैरवापरही वाढला आहे. अनेक लोक कोणताही विचार न करता मनाला वाटेल ते समाजमाध्यमांवर अपलोड करतात. कोणी काय लिहावे? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचे भान राखणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. अनेक दहशदवादी संघटना याच समाजमाध्यमांच्या मदतीने तरुण वर्गाला चुकीच्या मार्गावर नेत आहेत. त्यामुळे ट्विटर अकाऊंट उघडले की काहीतरी नकारात्मकच वाचायला मिळते. आणि असा एक नकारी विचार आपला संपूर्ण दिवस खराब करतो. त्यामु़ळे यावर एकमेव उपाय म्हणजे स्वत:च त्यापासून दूर जाणे आहे. म्हणूनच त्याने आपले ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed sheeran quit twitter hollywood katta part
First published on: 16-07-2017 at 04:42 IST