एकता कपूरने पुन्हा एकदा आपल्या ‘क’ मालिकांना सुरूवात केली आहे. काही काळापुरती चित्रपटनिर्मितीत दंग असलेल्या एकताने त्याच्यातून डोकं बाहेर काढून पुन्हा एकदा छोटय़ा पडद्याकडे मोर्चा वळवला असून ‘कुमकुम भाग्य’ ही तिची नवी मालिका झीटीव्हीवर दाखल होते आहे. गंमत म्हणजे या नव्या ‘क’ मालिकेसाठी तिने चक्क आपला ‘पवित्र रिश्ता’च बदलून टाकला आहे.
एकताची ‘पवित्र रिश्ता’ गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे झीटीव्हीवर रात्री नऊच्या प्राईम टाईम वेळेत सुखाने नांदत होती. त्यामुळे तिनेही चित्रपटांमध्ये आपले लक्ष गुंतवले होते. पण, ‘पवित्र रिश्ता’तून सुशांत सिंग राजपूत बाहेर पडला आणि त्याने बॉलिवूडमध्ये जम बसवला त्याला दोन वर्ष होतील. कसंबसं वेगवेगळे चेहरे आणत हा रिश्ता नांदवायचा प्रयत्न एकताने केला. मात्र, आता तिलाच त्या ‘पवित्र रिश्ता’चा कंटाळा आला असावा बहुधा. (पण, म्हणून ती ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका बंद करणार नाही आहे) म्हणून तिने नव्या तिच्यासाठी शुभशकु नी ठरणाऱ्या ‘क’ पासूनच्या मालिकांची सुरूवात केली आहे.
एकताची ‘कुमकुम भाग्य’ ही नविन मालिका सुरू होत असून यात तिचा लाडका अभिनेता शब्बीर अहलुवालिया रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्या नायिकेच्या भूमिकेत ‘बालिकावधू’ मालिकेतील गंगा म्हणजेच स्रिती झा हिती निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय, स्रितीच्या बहिणीच्या भूमिकेत मृणाल ठाकूर या मराठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. मृणालने ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘मुझसे कुछ कहती है यह खामोशियाँ’ नावाच्या लांबलचक मालिकेत मुख्य नायिका साकारली होती. जेन ऑस्टिनच्या ‘सेन्स अँड सेन्सिबिलीटी’ या अभिजात कादंबरीचा आधार घेऊन ‘कुमकुम भाग्य’ची कथा रचण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ‘कुमकुम भाग्य’ नावाने लग्नाचा हॉल चालवणारी सरला, तिच्या दोन मुली बानी आणि प्रज्ञा यांच्याभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे.
आपल्या नव्या मालिकेसाठी एकताने झी टीव्हीवर नऊच्या प्राईम टाईम स्लॉटमध्ये सुरू असणाऱ्या ‘पवित्र रिश्ता’ या आपल्याच मालिकेची वेळ बदलायची ठरवली आहे. त्यामुळे आता रोज रात्री नऊला ‘कुमकुम भाग्य’ पहायला मिळेल. नवी ‘क’ मालिको एकताला पुन्हा पूर्वीसारखं यश मिळवून देणार की नाही, याची उत्सूकता की चिंता सध्या एकतालाही सतावते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2014 रोजी प्रकाशित
एकताची नवी ‘क’ मालिका
एकता कपूरने पुन्हा एकदा आपल्या ‘क’ मालिकांना सुरूवात केली आहे. काही काळापुरती चित्रपटनिर्मितीत दंग असलेल्या एकताने त्याच्यातून डोकं बाहेर काढून पुन्हा एकदा छोटय़ा पडद्याकडे मोर्चा वळवला असून

First published on: 02-03-2014 at 06:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoors new k serial