‘बालक पालक’ आणि ‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव आता तुलनेत नव्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करणार आहेत. आजच्या तरुणाईपर्यंत ‘रेगे’ हा चित्रपट अधिक प्रभावीपणे पोहोचावा, त्यासाठी जाधव यांनी आपल्या खास पद्धतीने हा चित्रपट प्रस्तुत करण्याचे ठरविले आहे. अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शित ‘रेगे’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पोलीस दलात आणि समाजातही खळबळ उडवून देणाऱ्या एका एन्काऊंटर प्रकरणाचा संदर्भ या चित्रपटाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मामि), पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि गोवा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट कौतुकाचा विषय ठरला होता. चित्रपटात महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, आरोह वेलणकर, संतोष जुवेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘रेगे’चे छायालेखन प्रसिद्ध सिमेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केले आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पानसे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
रवी जाधव यांनी ‘मामि’ व गोवा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पाहिला आणि ते प्रभावित झाले. ‘बालक पालक’ आणि ‘टाइमपास’ या चित्रपटातून जाधव यांनी पौंगडावस्थेतील मुलांचे भावविश्व रेखाटले होते. ‘रेगे’ चित्रपटात त्यापुढील वयात आलेल्या तरुणांच्या भावविश्वातील निर्णायक वळणावरचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे.
मराठीतील एक यशस्वी दिग्दर्शक तुलनेत नव्या असलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपणहून पुढे येतो, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बाब असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. याआधी रवी जाधव यांनी नागराज मंजुळे यांच्या ‘फॅण्ड्री’ चित्रपटालाही प्रचारतंत्रासाठी मार्गदर्शन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2014 रोजी प्रकाशित
प्रथितयश दिग्दर्शकाकडून नवोदिताच्या चित्रपटाचे ‘प्रमोशन’
‘बालक पालक’ आणि ‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव आता तुलनेत नव्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करणार आहेत.
First published on: 21-06-2014 at 07:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Established director ravi jadhav set to promote new comer movie rege