एखादं नाटक जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं, त्या नाटकाला जेव्हा ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागते तेव्हा अर्थात कलाकारांचं, दिग्दर्शकाचं आणि निर्मात्याचं कौतुक होतं. हे नाटक फारच सुंदर आहे, आतापर्यंत आम्ही असं नाटक पाहिलंच नाही. अशा कौतुकाच्या अनेक चांगल्या गोष्टी कलावंतांच्या कानावर पडत असतात. पण हे नाटक उभं करायला ज्या इतर कलाकारांची मदत लागते, ते मात्र फारसे लोकांसमोर येत नाही. नाटकाची खरी ओळख ही कथा आणि कलाकार हेच असले तरी ते तेव्हाच खुलून दिसते जेव्हा त्याला संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्याची साथ मिळते. हे कलाकार जरी पडद्यामागे असले तरी त्यांचं योगदान हे कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नसतं. आतापर्यंत १०० हून अधिक नाटकांना ‘प्रकाश’ देणारे प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे सांगतायेत त्यांच्या पडद्यामागच्या गोष्टी…
इंटरकॉलेज स्पर्धांमध्ये मी, मकरंद देशपांडे अभिनय करायचो. पण अनेकदा एखादा मुलगा आला नसेल तर त्याचं काम कोणा ना कोणाला करावं लागायचं. असंच एका प्रयोगावेळी ‘लाइट्स’ बघणारा मित्र आला नव्हता आणि कमी तिथे आम्ही याप्रमाणे माझ्याकडे लाइट्सची जबाबदारी आली. तो दिवस मी कसा तरी सांभाळून नेला. पण नंतर इतरांपेक्षा मी चांगलं करतो असं वाटून लाइट्सची जबाबदारी माझ्यावरच टाकण्यात आली. मलाही यात गोडी वाटू लागली. मग काय लाइट्सचं कोणत्याही पद्धतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतानाही फक्त शिकत आणि अनुभवातून मी आज इथपर्यंत पोहोचलो.
मी ‘रस्ते’ नावाचं एक नाटक करत होतो, त्याच्या प्रकाशयोजनेची जबाबदारी माझ्यावर होती. ते नाटक बघायला सत्यदेव दुबे आले होते. नाटकाच्या मध्यंतरात दुबेंनी मला भेटायला बोलवलं. तेव्हा मला फार भीती वाटली होती. ते फार कडक आहेत, फार कोणाचं कौतुक करत नाहीत, असं मी ऐकलं होतं. आता त्यांनीच मला भेटायला बोलावलं म्हणून जरा घाबरलेलोच. पण, ‘तळपदे तुझं काम मला फार आवडलं. फार कमी लोकं अशा पद्धतीने काम करतात,’ अशी शाबासकीची थाप त्यांनी मला दिली. त्यादिवशी मला हे बऱ्यापैकी जमतंय आणि आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे हे जाणवलं. सत्यदेव दुबेंबरोबरचं ते संभाषण आजही माझ्या डोळ्यांपुढं जसंच्या तसं उभं राहतं.
प्रकाशयोजना ही एक अशी गोष्ट आहे की, ती नाटकाला अधिक उठावदार बनवते. पण, म्हणून लाइट्स जास्त चांगल्या आणि नाटक बरं होतं असं कधी होत नाही. आजही नाटकाची ताकद अभिनय, संहिता, दिग्दर्शन यावरच आहे. पण त्याला जर योग्य संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य असेल तर ते नाटक अधिक खुलून दिसतं. त्यामुळे नाटकाची ताकद अधिक वाढवण्याचं काम या तीन गोष्टी करतात. रंगभूमीवर सतत नवनवीन प्रयोग होत राहिले पाहिजेत, ही काळाची गरजच आहे. अन्यथा टीव्ही पाहणारा प्रेक्षकवर्ग थिएटरकडे ओढला जाणार नाही. घरी बसलेल्या प्रेक्षकाला जर थिएटरमध्ये उत्सुकतेपोटी आणायचं असेल तर नाविन्याला पर्याय नाही, असं मला वाटतं.
माझ्यासाठी थिएटर ही जादूमय गोष्ट आहे. इथं माणूस स्वतःला शोधत असतो. अनेकदा आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, असा प्रश्न ही पडतो. पण, खरं सांगायचं तर नाटक ही जगण्याची कला आहे. ती तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते. मी अजूनही शिकतोच आहे आणि मला माहितीये की रंगभूमीवरचा प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर शिकण्यासाठीच तिथे येतो.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com