इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी अर्थात आयफा या नावाने गेल्या दीड दशकापासून बॉलीवूड चित्रपटाचा पुरस्कार  सोहळा दरवर्षी निरनिराळ्या देशांमध्ये साजरा केला जातो. यंदाच्या सोळाव्या वर्षांतील आयफा पुरस्कार सोहळा मलेशियामध्ये जून महिन्यात आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची घोषणा अनिल कपूर, बिपाशा बासू यांच्यासह आयफाच्या समितीतील अन्य काही जणांनी कौलालंपूर येथे केली आहे. बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण साठच्या दशकापासून युरोपमध्ये करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी परदेशी चित्रीकरण करून तयार झालेल्या चित्रपटांची संख्या उत्तरोत्तर वाढतच गेली.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी युरोप, अमेरिका खंडांतील देश तसेच आशिया खंडातील विविध देशांमध्ये जाऊन चित्रीकरण करणे, तेथील नयनरम्य स्थळांचे दर्शन भारतीय चित्रपटांच्या प्रेक्षकांना दाखविणे याचे अप्रूप होते. परंतु, आता दळणवळणाच्या सुविधा मुबलक झाल्यानंतर आणि माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळेही परदेशाचे दर्शन चित्रपटात पाहण्याचे कुतूहल आपोआपच कमी झाले. मात्र, गेल्या दीड दशकापासून  बॉलीवूडवाल्यांना आपले चित्रपट भारतासह विविध देशांमध्ये त्या त्या भाषांमधील उपशीर्षकांसह प्रदर्शित करण्याचे वेध लागले. त्यातूनच बॉलीवूडचे बलाढय़ निर्माते आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय हॉटेल्स यांनी एकत्र येऊन आयफा संस्थेची निर्मिती करण्यात आली.
 बॉलीवूड चित्रपटांचे परदेशांत जाऊन मार्केटिंग करणे आणि तेथे प्रेक्षकवर्ग तयार करणे हा मुख्य उद्देश आयफा पुरस्कार सोहळा भरविण्यामागे आहे. त्यात बॉलीवूड निर्मात्यांना यश मिळाले आहे.
यंदाच्या १६ व्या आयफा पुरस्कार सोहळ्याची कौलालंपूर येथे घोषणा करण्याबरोबरच अनिल कपूर, बिपाशा बासू यांनी तेथील पारंपरिक पोषाखातील कलावंतांसोबत सादरीकरणही केले.  ५  ते ७ जून दरम्यान होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ६ जूनला ‘दिल धडकने दो’ हा बॉलीवूडच्या आगामी हिंदी चित्रपटाचा प्रीमियर खेळ आयोजित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expect a truly malaysia experience at iifa
First published on: 12-04-2015 at 12:25 IST