पटकथा संवादलेखक शं. ना. नवरे, निर्माती-दिग्दर्शिका स्मिता तळवलकर आणि असिस्टंट दिग्दर्शक संजय सूरकर असे हे तिघे मान्यवर कोणत्या बरे चित्रपटाच्या सेटवर चर्चेत रमलेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आहे, अस्मिता चित्र या निर्मिती संस्थेच्या ‘सवत माझी लाडकी’ (१९९३) या खुमासदार चित्रपटाच्या सेटवरचा हा प्रसंग आहे. स्मिता तळवलकरने ‘कळत नकळत’ (१९३९), दिग्दर्शक कांचन नायक ) पासून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकताना वेगळा आशय व मनोरंजन यांचा योग्य तो समतोल साधण्यात यश मिळवून आपल्या चित्रपटाचा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला. ‘सवत माझी…’ हलका फुलका मजेशीर चित्रपट होता. मंदाकिनी गोगटे यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. आपल्या पतीच्या (मोहन जोशी) आयुष्यात एक देखणी युवती (वर्षा उसगावकार) आली असल्याचे अगदी वेगळेच स्वप्न एक विवाहिता (नीना कुलकर्णी) पाहते यामधून निर्माण होणारी सोय/ गैरसोय आणि गंमत-जमंत याभोवती हा चित्रपट होता. थोडे वास्तव आणि बरीचशी कल्पनारम्यता यांची सांगड घालून हा चित्रपट रंगला. याचे जवळपास सर्वच चित्रीकरण कोल्हापुरात झाले. त्या सुमारास मराठी चित्रपटाच्या ध्वनिफितीची फारशी विक्री होत नसल्यानेच स्मिताने चित्रपटात एकाही गाण्याचा समावेश केला नाही. अन्यथा गाण्याला पटकथेत स्थान होते. ती कसर मोहन जोशी व वर्षा उसगावकार यांच्यावरील रंगतदार प्रेम प्रसंगातून भरून काढली. वर्षाच्या काही उल्लेखनीय भूमिकेतील ही एक. तसेच तिच्या ग्लॅमरला छान वाव देणारी. तिने ही भूमिका खूप एन्जॉय तर केलीच पण एक महिला दिग्दर्शिका असल्याने या भूमिकेवर अधिक चर्चाही करता आली असेच वर्षाचे मत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटात प्रशांत दामले, जयमाला शिलेदार, अमिता खोपकर, आनंद अभ्यंकर इत्यादींच्याही भूमिका होत्या. सुधीर जोशी व रमेश भाटकर पाहुणे कलाकार होते. हरिष जोशी छाया दिग्दर्शक होते. स्मिता तांत्रिक पातळीवर देखिल विशेष रस घेई. या चित्रपटाची जास्त भिस्त संवाद व अभिनय यावर होती. आणि त्यात चित्रपटाने छानच बाजी मारून समिक्षक व प्रेक्षक या दोघांचीही दाद मिळवली. त्यानंतर काही वर्षांतच आलेल्या राज कंवर दिग्दर्शित ‘जुदाई’ची मध्यवर्ती कथासूत्र या चित्रपटावरून तर सुचले नाही ना अशी चर्चा होणे ‘सवत’चे यश होते. खोट्या श्रीमंतीच्या आनंदासाठी त्यात पत्नी (श्रीदेवी) आपल्याच पतीचे (अनिल कपूर) लग्न एका श्रीमंत युवतीशी ( उर्मिला मातोंडकर) लावून देते अशी कल्पना होती. सवत माझी लाडकीला राज्य शासनाकडून त्यावर्षी चौदापैकी पाच पुरस्कार मिळाले. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट तृतीय क्रमांक व दिग्दर्शन या दोन पुरस्कारासह नीना कुलकर्णी व प्रशांत दामले यांना अभिनयाचा तर विश्वास दाभोळकर व अनिल कावले यांना संकलनाचा पुरस्कार प्राप्त झाला.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falshback by dilip thakur marathi movie savat mazi ladki
First published on: 01-09-2017 at 01:05 IST