अभिनेते धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतले असे अभिनेते आहेत ज्यांनी एक काळ आपल्या अभियनाने गाजवला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या अलिकडच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही धर्मेंद्र दिसले होते. मात्र एक काळ त्यांचा होता. हिंदी चित्रपटसृष्टीतले ही मॅन ही त्यांची ओळख आहे. याच धर्मेंद्र यांचा एक चित्रपट होता तो म्हणजे लोफर. या लोफर चित्रपटातील धर्मेंद्र यांचं एक तैलचित्र त्यांना भेट देण्यात आलं.
कला दिग्दर्शक देवीदास भंडारेंनी धर्मेंद्र यांना दिली तैलचित्राची भेट
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शन देवीदास भंडारे यांनी रेखाटलेलं ‘लोफर’ या चित्रपटातील धर्मेंद्र यांचं पेटिंग देवीदास भंडारे यांनी त्यांना जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिलं. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेते रणजीतही त्यांच्यासह होते. लोफर या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या त्या काळच्या हिट चित्रपटातले चित्र देवीदास भंडारे यांनी हुबेहुब साकारल्याबद्दल धर्मेंद्र यांनी त्यांचं कौतुक केलं. इतकंच नाही तर हे चित्र त्यांनी तातडीने त्यांच्या बंगल्यात लावलंही.
धर्मेंद्र काय म्हणाले?
धर्मेंद्र यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे चित्र पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला काय वाटतं आहे ते मला शब्दांत मांडता येणार नाही असं धर्मेंद्र म्हणाले. देवीदास भंडारे यांनी विशेष फिल्म या बॅनरखाली दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या अनेक चित्रपटांचे तसेच काही मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. कला दिग्दर्शकाने दिलेलं हे चित्र पाहून धर्मेंद्र चांगलेच सुखावले.
१९७३ मध्ये प्रदर्शित झाला होता लोफर हा चित्रपट
लोफर हा चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र, मुमताज, पद्मा खन्ना, ओमप्रकाश, प्रेमनाथ, के. एन. सिंग यांच्या भूमिका होत्या. रणजीत हे पात्र धर्मेंद्र यांनी साकारलं होतं. तर अंजूच्या भूमिकेत मुमताज होत्या. पाकिटमार आणि लोफर असलेला रणजीत रुपाच्या प्रेमात पडतो आणि मग काय काय होतं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. कोई शहरी बाबू, आज मौसम बडा बेईमान है बडा ही या चित्रपटातील गाजलेली गाणी. या चित्रपटाला ५० हून अधिक वर्षे झाली आहेत. त्याच निमित्ताने देवीदास भंडारे यांनी धर्मेंद्र यांना त्यांचं या चित्रपटातलं खास तैलचित्र भेट दिलं. जे पाहून धर्मेंद्र यांना मनस्वी आनंद झाला.