कन्नड चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध कॉमेडियन बुलेट प्रकाश यांचे दु:खद निधन झाले. यकृताचा संसर्ग झाल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ते शरीराच्या वजनावर फार काम करत होते. त्यांनी काही दिवसांतच ३५ किलो वजन कमी केलं होतं असं म्हटलं जातं. एकाएकी इतकं वजन कमी केल्याने त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली अशी माहिती समोर येत आहे. बुलेट प्रकाश यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बुलेट प्रकाश यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘ध्रुव’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यांनी कन्नडसोबतच तामिळ व इतर भाषांच्या चित्रपटांमध्येही काम केलं. ते नेहमीच रॉयल एनफील्ड मोटारसायकल वापरायचे. म्हणूनच त्यांचं नाव बुलेट प्रकाश असं ठेवलं गेलं. २०१५ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.

बुलेट प्रकाश यांनी त्यांच्या करिअरमध्ये जॅकी, बॉम्बे मित्तई, भीष्म, मस्त माजा मादी आणि महबूब यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी पुनित राजकुमार, दर्शन, शिवराज कुमार, उपेंद्र, सुदीप यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला होता.