वझीर या आगामी चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्यात काही प्रणयदृश्ये चित्रीत करण्यात आली होती. पण चित्रपटकर्त्यांनी आता ‘त्या’ दृश्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील ‘त्या’ दृश्यांवरुन सेन्सॉर बोर्डाशी वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
चित्रपटाचा भाग म्हणून फरहान आणि अदिती राव यांच्यात काही हॉट सिन्स चित्रीत करण्यात आले होते. पण ते पाहिल्यानंतर त्यावर दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांची सविस्तर चर्चा झाली. चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांना ‘वझीर’ चित्रपटाला घेऊन सेन्सॉर बोर्डाचा कोणताही वाद ओढावून घ्यायचा नव्हता. चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेईल, अशी सर्वांची खात्री झाल्याने अखेर ‘ती’ दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्याचे ठरविले गेले.
बिजॉय नांबियार दिग्दर्शत वझीर हा चित्रपट येत्या ८ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता फरहान अख्तर, नील नितीन मुकेश आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.