बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘तारे जमीन पर.’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला असून चित्रपटात अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आमिर खान आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्यामध्ये चित्रपटाच्या क्रेडिटवरुन वाद झाला होता. आता तब्बल १४ वर्षांनतर अमेल गुप्ते यांनी या वादावर वक्तव्य केले आहे.

अमोल गुप्ते यांनी नुकताच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या वेळी क्रेडिटवरुन झालेल्या वादावर वक्तव्य केले आहे. ‘तो वाद होऊन आता बराच काळ लोटला आहे. सूर्यास्तानंतरच सूर्योदय होता आणि मी भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा फार विचार करत बसत नाही. खासकरुन ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. मी प्रत्येक दिवस एक आव्हान म्हणून स्वीकारतो. आता त्या घटनेला १४ वर्षे उलटून गेली आहेत’ असे अमोल गुप्ते म्हणाले.

काय होता वाद?
‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीला अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शन केले होते. पण काही कारणास्तव चित्रपट सोडला आणि त्यानंतर आमिर खानने चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पण चित्रपट प्रदर्शित करताना तेथे दिग्दर्शक म्हणून आमिरचे नाव देण्यात आले. अमोल गुप्ते यांचा लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून उल्लेख होता.