सुनील आणि कपिलचा वाद आता एक महिन्यांहूनही अधिक जुना झाला. सुरुवातीला सुनील-कपिल एकत्र येतील असेच त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण प्रत्येक दिवसागणिक हा वाद चिघळत गेला आणि सुनील- कपिल कधीच एकत्र येणार नाहीत, अशी खात्री प्रेक्षकांना पटली होती.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो त्याचप्रमाणे आता सोनी टीव्हीच्या ‘सबसे बडा कलाकार’ या शोमध्ये अली असगर, सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा दिसणार आहेत. सुनील आणि अली हे एकत्र एपिसोडचं शुटिंग करत आहेत. यात सुनील डॉ. मशहुर गुलाटीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तर असगर त्याची नर्स म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलही या शोचा एक भाग असून शोचे परीक्षक बोमन इराणीसोबत नुकताच त्याने एक सेल्फीही काढला. पण एकाच शोमध्ये दिसणार असूनही कपिल आणि सुनीलने एकत्र शूट केले नाही.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. गुलाटी आणि रिंकू भाभीला बघायला सुनीलचे चाहते आतूर झाले असताना, सुनील या शो व्यतिरिक्त अन्य शोमध्ये सातत्याने झळकत आहे. सुरूवातीला सुनील ‘इंडियन आयडल’च्या व्यासपीठावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला, तर आता ‘सबसे बडा कलाकार’च्या सेटवरही त्याने सर्वांची मनं जिंकली. प्रेक्षक त्याला विसरू नये याची योग्य ती खबरदारी घेताना तो दिसत आहे. त्याच्या या प्रयत्नाला यावेळी अली असगरनेही साथ दिली.

‘कपिल शर्मा शो’मध्ये नानीची व्यक्तिरेखा साकारणारा अली यावेळी लैला नर्सच्या भूमिकेत दिसला. मेच्या ७ तारखेला हा एपिसोड सोनी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. सोनीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन या दोघांनी एक व्हिडिओही शेअर केला. यात सुनील सध्या त्याच्याकडे काम नसल्यामुळे मोकळाच असल्याचे सांगत स्वतःवरच कोपरखळी मारली. दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोघंही भरपूर मजा करताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सर्वांची लाडकी ‘बुवा’ म्हणजेच उपासना सिंगचं पुनरागमन झाले आहे. पण यावेळी ती बुवा म्हणून नाही तर कपिलची मावशी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.