विविध ठिकाणी गाण्याच्या लाइव्ह कॉन्सर्सट्स करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक अंकित तिवारी, आकृती कक्कर आणि शिल्पा राव यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अमेरिकन कंपनीतर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात अंकितच्या भावाचं म्हणजेच अंकुर तिवारी याचंही नाव आहे.
अमेरिकन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘दीप व्हीआयपी ट्रॅव्हल्स’ या कंपनीकडून ‘ब्रदरहूड एण्टरटेन्मेन्ट’ या कंपनीने एका कार्यक्रमासाठी ३० लाख रुपये घेतले होते असं या तक्रारीत म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी गायक अंकित तिवारी आणि त्याचा भाऊ अंकुर यांच्या मालकीची असून, शिल्पा राव या कंपनीत भागीदार आहे. या कंपनीने त्या अमेरिकन कंपनीकडून पैसे घेतल्यानंतर कार्यक्रमात परफॉर्म करण्यास नकार दिला. त्या कंपनीने बऱ्याचदा या गायकांकडून पैसे परत मागितले. एकतर पैसे परत द्या किंवा कार्यक्रम सादर करा अशी अट ठेवली. पण, या गायकांनी याकडे वारंवार दुर्लक्ष केलं. सरतेशेवटी त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अंकित, आकृती आणि शिल्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
जवळपास दोन वर्षे उलटली असूनही हे तिन्ही गायक त्यांनी दिलेल्या शब्दाला जागले नाहीत. तक्रारदार दीप कुमार वोहरा यांनी लावलेल्या आरोपांनुसार, अमेरिकेहून मुंबईत येत ये सर्व प्रकरण हाताळण्यासाठी आणि हा तिढा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला असून, त्या गायकांनी मात्र कोणत्याच प्रकारचं उत्तर दिलेलं नाही.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
ओशिवरा पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे तिन्ही गायक मुंबईबाहेर असून, ते परत येताच जबाबासाठी त्यांना बोलावलं जाईल. तेव्हा आता या गायकांकडून याप्रकरणी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.