” ऋण” या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी सिनेमातील मुख्य अभिनेत्री नारायणी शास्त्री, दिग्दर्शक विशाल गायकवाड, अभिनेते जयराज नायर, संगीतकार सिद्धार्थ आणि संगीत हळदीपूर कॅमेरामन नजीब खान आणि संवाद लेखक अजितेम जोशी आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थितीत होती.     
शिक्षणासाठी एका खेडेगावातून शहरात आलेल्या एका गरीब मुलाची राहण्याची, खाण्याची आणि जगण्याची होणारी ससेहोलपट आणि त्यातून त्याला बाहेर  काढण्यासाठी अशा एका व्यक्तीचे प्रयत्न ज्या व्यक्तीला समाजात माणूस म्हणून स्वीकृती नाही, कारण ती एक तृतीयपंथीय आहे. अशा या समाजातील दोन पूर्णपणे वेगळ्या असलेल्या समाजातील व्यक्तींच्या नाजूक संबंधांवर आधारित “ऋण” सिनेमाची कथा असून ही कथा एका सत्य घटनेवर आधरित आहे.           
“ऋण” सिनेमातून अभिनेत्री नारायणी शास्त्रीचे तब्बल दहा वर्षानंतर मराठी सिनेमात पुनरागमन होत आहे. मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री अभिनेत्री तृतीयपंथीयाची आव्हानात्मक अशी भूमिका नारायणीने साकारली आहे. ‘जेव्हा या  सिनेमाची स्क्रिप्ट मला ऐकवण्यात आली त्याच क्षणी मला ती खूप आवडली. एका स्त्रीसाठी हे पात्र साकारण हे किती आव्हानात्मक असू शकते याचा अंदाज मला स्क्रिप्ट वाचतानाच आला होता. तृतीयपंथी यांबद्दल समाजात जी टिंगल केली जाते ती खऱ्या अर्थाने योग्य नसून देवानेच त्याना समाजात स्त्री, पुरुष यांच्याबरोबर या तृतीयपंथीयांना बनविले आहे. आपल्या जशा काही अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याही काही अपेक्षा, भावना, इच्छा आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. असा हा नाजूक आणि तितकाच सामाजिक विषय केवळ मराठी सिनेमांमधूनच रसिकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो कारण या मराठी रसिक श्रोत्यांकडूनच त्याला योग्य तो न्याय मिळू शकतो’, असे अभिनेत्री नारायणी शास्त्रीने सांगितले. तसेच या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी माझे वजन तब्बल १५ किलोने वाढविले असून डबिंगसाठी ही मी तेवढीच जास्त मेहनत घेतल्याचे नारायणी यांनी आवर्जून नमूद केले       
“ऋण” सिनेमात अभिनेते मनोज जोशी आणि राजेश्वरी सचदेव या हिंदीतील नामवंत कलाकारांबरोबरच ओमकार गोवर्धन, अनंत जोग, विनय आपटे, विजय पाटकर, उषा नाईक, विवेक लागू, जयराज नायर आदी या प्रसिद्ध कलाकारांच्या ही महत्वपूर्ण भूमिका आहेत. एक आगळी वेगळी प्रेमकथा असलेला सत्य कथेवर आधारित “ऋण” सिनेमा येत्या १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time actress in role of transgender in runh marathi movie
First published on: 25-04-2015 at 01:02 IST