अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शनातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे राज कपूरसारखे थोडेच, तर कलाकार म्हणून छान वाटचाल करीत असतानाच दिग्दर्शन करणारे बरेच. विविध दृष्टि, क्षमता व मानसिकता असणार्‍या अनेक दिग्दर्शकांसोबत भूमिका करता येणारा सर्व प्रकारचा अनुभव व आपण आता या व्यवसाय व माध्यमात पुढचे पाऊल टाकायला हवे ही भावना या सार्‍याच्या एकत्रितपणातून हे घडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमा मालिनीबाबत तेच घडलयं. ‘सपनो का सौदागर'(१९६९) या पहिल्याच चित्रपटाच्या वेळेस ‘ड्रीम गर्ल’ असे बिरुद प्राप्त करणारी हेमा मालिनी सत्तरच्या दशकातील ‘नंबर वन’ची अभिनेत्री म्हणून नावाजली गेली. विजय आनंद, रमेश सिप्पी, यश चोप्रा, प्रमोद चक्रवर्ती, गुलजार अशा त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारणारी हेमा मालिनी भविष्यात चित्रपट दिग्दर्शनाचे आव्हान स्वीकारेल असे कधीच वाटले नव्हते. पण ते हेमा मालिनीकडून पाऊल उचलले गेले तसे थोडेसे उशिराच. हेमा मालिनी दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘दिल आशना है’ १९९३ च्या जानेवारीत प्रदर्शित झाला.

त्यातही काही खास वैशिष्ट्य आहेत. शाहरुख खानने ‘फौजी’, ‘सर्कस’ या मालिकांतून मोठ्या पडद्यावर पहिले पाऊल टाकले ते हाच चित्रपट स्वीकारून. (मात्र ‘दीवाना’ सप्टेंबर १९९२ ला म्हणजेच ‘दिल आशना है’ पूर्वी प्रदर्शित झाला) दिव्या भारती नावारूपास येत असतानाच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याने तिच्या लहरी वागण्याचा हेमा मालिनीला त्रास होत असल्याचे गॉसिप्स तेव्हा गाजले.

आपला हुकमी हीरो जीतेन्द्रला हेमा मालिनीने महत्वाच्या भूमिकेसाठी निवडले हे विशेषच. इतर भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, डिंपल कापडिया इत्यादींना निवडले. पण स्वतःच्याच दिग्दर्शनात स्वतःच भूमिका करणे टाळलेही. त्याचे उत्तर तिने तेव्हा दिले नाही. सिन्नरजवळील घोटी येथील या चित्रपटाच्या सेटवर मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना नेले तेव्हाच्या गप्पांत हेमाने हा मुद्दा व्यवस्थित टाळला. अगदी धर्मेंद्रलाही अभिनेता म्हणून तिने निवडले नाही व खाजगी आयुष्य आणि व्यावसायिकता याचा समतोल साधला. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धर्मेंद्रच्याच हस्ते आपल्या चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिफित तिने प्रकाशित करुन आपलेपण जपले. हेमा मालिनीचे चित्रपट दिग्दर्शन म्हणून या चित्रपटाची भरपूर चर्चा रंगली पण चित्रपटाला माफक यशावर समाधान मानावे लागले. एक गोष्ट उल्लेखनीय, हेमा मालिनीच्या समकालीन नायिका म्हणजे लीना चंदावरकर, रेखा, राखी, झीनत अमान, नीतू सिंग, शबाना आझमी या मात्र चित्रपट दिग्दर्शनाकडे कधीच वळल्या नाहीत.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback by dilip thakur hema malini as director
First published on: 20-10-2017 at 05:15 IST