हिंदी चित्रपटसृष्टीतील तारा मराठी पडद्यावर ही फारच कौतुकाची गोष्ट. कोणी आपले हिंदीतले उत्तम संबंध उपयोगात आणले, तर कोणी उत्तम बिदागी देऊन हिंदीतला कलाकार मराठीच्या पडद्यावर आणला. याचा मराठी चित्रपटाला गर्दीसाठी खरच किती फायदा झाला, हा वेगळा संशोधनाचा विषय. धर्मेन्द्र आला तो मात्र बाबासाहेब कदम यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन उत्तम संबंधातून. चित्रपट होता १९८६ सालचा ‘हिच काय चुकलं’. रंजना, विक्रम गोखले, रवि पटवर्धन, शुभा खोटे, विजय कदम आणि राम टिपणीस इत्यादींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील ‘घेऊन टांगा सर्ज्या निघाला’ हे गाणे धर्मेन्द्रवर चित्रीत झाले जोडीला विक्रम गोखले होता. साकी नाक्याजवळच्या चांदिवली स्टुडिओत घोडागाडीसह चित्रीकरण करण्याचे ठरले. धर्मेन्द्रने त्यासाठी बरेच सहकार्य दिले. तसा तो भावूक आणि उपकारकर्त्यांना न विसरणारा म्हणूनच ओळखला जातो. अर्थात, हिंदीतला पाहुणा मराठीत आणताना त्याचा वाहक, सहाय्यक, मेकअपमन, ड्रेसमन असा सगळाच लवाजमा सांभाळायचे कष्ट मराठी निर्मात्याला घ्यावे लागतात अशी जुनी कुजबुज आहे. धर्मेद्र या साऱ्याला आपवाद ठरला. तेवढी ती उन्हापासून बचाव करणारी छत्री त्याला वेळीच डोक्यावर हवी होती. ही गोष्ट अगदी छोटी वाटते, पण प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळी ती महत्वाची असते. त्यातूनच मोठ्या कलाकारांचा मूड कायम राहतो. चित्रपट निर्मितीत अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी अनुभवायला मिळतात. ‘हिचं काय चुकलं’चे हे गाणे खूप लोकप्रिय असल्याने त्यानिमित्ताने धर्मेन्द्रचीही आठवण येते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback dharmendra guest appearance in marathi movie hich kay chukal
First published on: 01-01-2016 at 01:05 IST