बाई……वाड्यावर चला! या वाक्याची आजवर असंख्य कलाकारांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना प्रत्येकाच्या नकला करण्याची प्राथमिक हौस आणि याकरता केलेला पहीला प्रयत्न याच संवादाने होत असावा. पण हा संवाद ज्यांनी चंदेरी पडद्यावर जिवंत केला अशा निळू फुलेंची सर मात्र कोणालाच नाही. भारदस्त आणि रांगडा आवाज, अस्सस मराठमोळा बाज आणि त्यात धोतराचा शेव हातात पकडून भेदक नजरीचा मारा करणारे व्यक्तिमत्त्व म्हटले की एकच चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो आणि तो चेहरा म्हणजे निळू फुले यांचा. हा हरहुन्नरी अभिनेता चित्रपटसृष्टीला आजच्याच दिवशी अखेरचा रामराम करुन गेला, अशा या निळू फुलेंचा आज सातवा स्मृतिदिन आहे. निळूभाउंचे चित्रपटसृष्टीतील योगदान आणि त्यांची उत्तुंग कारकिर्द पाहता त्यांना सबंध चित्रपट वर्तुळातून आणि त्यांच्या चाहत्यांकडून आदरांजली दिली जात आहे.
‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करत ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णांची’ भूमिका निळू फुलेंना चित्रपट जगतात एक वेगळीच ओळख देउन गेली. मराठी चित्रपट सृष्टीत ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटातून निळूभाउंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत.
नाटक आणि सिनेमामधून त्यांनी साकारलेल्या नायकी-खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली खरी, पण निळू फुलेंनी साकारलेल्या जवळपास सर्वच खलनायकी पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. नाट्यक्षेत्रातही त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय.
मराठीसोबतच निळू फुलेंनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काही भूमिका साकारल्या, ‘कूली’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या अमिताभ बच्चनच्या मामाची भूमिका ही त्यापैकीच एक. निळूभाउंच्या भूमिका पाहताना ‘रक्तात भिनलेला अभिनय’ काय असतो, याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही.
निळू फुले चित्रपटांतून जरी जुलमी, अन्यायी खलनायकी भूमिकांचे कर्ते असले तरीही त्यांच्या रोजच्या जीवनात मात्र अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक भान, जबाबदाऱ्या ओळखणारा एक वेगळाच चेहरा त्यांच्यासमवेत काम केलेल्यांनी अनुभवला आहे.