dilip-thakur-loksattaएका चित्रपटाचा पुढचा भाग, कधी दुसऱ्या भागाचा तिसरा चित्रपट हे आता रुळलय. वीस वर्षापूर्वी त्यात नाविन्य होते. ते फक्त विदेशी चित्रपटाच्या संस्कृतीला साजेसे आहे, असे म्हटले जात असल्याने तर हिंदीसाठी तसा साधा विचार कोणी करीत नव्हते. तो केला निर्माता टी. पी. अग्रवाल व दिग्दर्शक अशोक त्यागी यांनी आणि त्यांनी शिव धनुष्य उचलले ते दिग्दर्शक विजय आनंदच्या ‘ज्वेल थीफ’ चे (१९६७). हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट. त्याचे रहस्य अखेरपर्यंत असा काही चकमा देते की, ‘क्लायमॅक्स’ला खरा चोर समजल्यावर आपण गांगरून जातो. गीत-संगीत-नृत्याची रहस्यपटातील गुंफण अप्रतीम. ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ नावाने हा पुढचा भाग करायचे ठरले तेव्हा फिल्मालय स्टुडिओतील त्याचा मुहूर्त विजय आनंदच्याच हस्ते व्हावा अशी निर्माता-दिग्दर्शकाची तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही. खुद्द विजय आनंदला हा प्रकार (की खेळ?) मंजूर नव्हता अशी मुहूर्तालाच हजर राहताना कुजबूज ऐकू आली. पहिल्या चित्रपटातील दादामुनी अशोक कुमार आणि देव आनंद यांच्या जोडीला आता धर्मेन्द्र, जॅकी श्रॉफ, शिल्पा शिरोडकर, सदाशिव अमरापुरकर आणि प्रेम चोप्रा आले. फिल्मालयमध्ये या चित्रपटासाठी दोन-तीनदा दीर्घकाळासाठी सेट लागले. देव आनंदसोबत काम करायला मिळणार याचा शिल्पा शिरोडकरला होणारा आनंद तिच्या भेटीत आवर्जून व्यक्त होई. …विशेष म्हणजे या ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’नेही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. …ही पहिल्या चित्रपटाची पुण्याईच म्हणावे.