dilip thakurआज हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रियांका चोप्रापासून (व्हेन्टीलेटर) कोणीही मराठी चित्रपटाची निर्मिती करताच अगदी मुहूर्तापाहूनच त्या चित्रपटाला आपलसं मानत त्याची दखल घेतो. पण मराठी चित्रपट निर्मातेही हिंदीत धडकलेत बरं का? चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावल्यास चित्रपती व्ही. शांताराम यांच्यापासून बरीच मान्यवर नावे घ्यायलाच हवीत. अशीच सुषमा शिरोमणी! मराठीत तिने नायिका, निर्माती व दिग्दर्शिका अशा तीनही गोष्टीत मसालेदार मनोरंजन चित्रपटात ‘फटाकडी’ म्हणून ठसा उमटवताना तिने रेखाला ‘कुठं कुठं जावू मी हनिमूनला’ या लावणी नृत्यावर जबरा नाचवले. मराठी चित्रपटातील हे पहिले आयटम साँग मानले जाते. मग सुषमा शिरोमणी गप्प राहतेय काय? जीतेंद्र, मौसमी चटर्जी (मोसंबी नारंगी) इत्यादी हिंदी तारे तिने मराठीच्या पडद्यावर नाचवले व इतक्यावरच न थांबता ती हिंदीत झेपावली. हे छायाचित्र तिने हिंदीत निर्मिलेल्या ‘प्यार का कर्ज’ (१९९०) या चित्रपटाच्या गीत ध्वनिमुद्रण निमित्तानाचे आहे. ताडदेवच्या फेमस रेकॉर्डिंग स्टुडिओत तिने संगीतकार लक्ष्मीकांत यांचे असे स्वागत केले. हिंदीत धडकताना सुषमाने तेथील वातावरण व व्यावसायिकता यानुसार काम केले. म्हणजे तिने तेथे ‘निर्मातीची भूमिका’ स्वीकारत वाटचाल केली. ‘प्यार का कर्ज’चे दिग्दर्शन के. बाप्पया यांजकडे दिले. त्या काळात दक्षिणेकडून हिंदीत आलेल्या आघाडीच्या दिग्दर्शकातील ते एक होते. चित्रपटात धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, मीनाक्षी शेषाद्री, सोनम, शक्ती कपूर, कादर खान, असरानी (ही त्या काळातील हुकमी त्रिमूर्ती) अरुणा इराणी अशी अस्सल हिंदीची स्टार कास्ट जमवली. आनंद बक्षींची गीते व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असे आणखीन एक हिंदीचेच पाऊल. ‘नैना तेरे नैनो की’, ‘यह जो आग लगी है दिलमे’ इत्यादी गाण्यासह चित्रपट प्रदर्शित करुन सुषमाने हिंदी चित्रपटसृष्टीचा आपण एक भाग होण्यात यश मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीला एकामागोमाग एक चित्रपट निर्माण करणारे आपलेसे वाटतात. सुषमाने अजय देवगण व उर्मिला मातोंडकर जोडीला घेऊन ‘कानून’ नावाचा चित्रपट निर्माण केला. इतरही काही हिंदी चित्रपट निर्माण करीत मराठी अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका हिंदीचे आव्हान स्वीकारते हो हे अधोरेखित केले. तेच महत्त्वाचे असते…
दिलीप ठाकूर