आपल्या बॉलीवूडला मैत्री या विषयाचे विशेष प्रेम आहे. कोणताही हिंदी चित्रपट घेतला तरी त्यात मित्र, मैत्रिणी, मैत्रीसाठी केलेला त्याग, प्रेमाला दिलेली सोडचिठ्ठी, धमाल यासह मैत्रीतील राग, लोभ, प्रेम, मत्सर आदी मसाला आणि खास चित्रित केलेली गाणी असतातच. त्याशिवाय हिंदी चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही.
मैत्री या विषयावर ‘दोस्ती’ या नावाचा चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुधीरकुमार (मोहन) आणि सुशीलकुमार (रामू) या नवोदित अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका यात होत्या. एक अंध आणि एक अपंग मित्र आणि त्यांची मैत्री असा विषय असलेल्या या चित्रपटातील मोहंमद रफी यांनी गायलेली ‘चाहुंगा मै तुझे सांझ सबेरे’ आणि ‘राही मनवा दुख की चिंता क्यौ सताती है, दुख तो अपना साथी है’, ‘जाने वालो जरा मुड के देखो मुझे’ ही गाणी लोकप्रिय झाली. ‘मैत्री’वरील पटकन आठवणारे आणि लोकप्रिय असलेले ‘जंजीर’ चित्रपटातील अभिनेते प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ हे गाणे. अमिताभ बच्चन यांना याच चित्रपटामुळे ‘अ‍ॅंग्री यंग मॅन’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. ‘आप की खातीर’ या चित्रपटातील विनोद खन्नावर चित्रित झालेले ‘बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो’ हे गाणे म्हटल्याशिवाय कोणतीही पिकनिक किंवा गाण्याच्या भेंडय़ा पूर्ण होऊच शकत नाहीत. भाप्पी लाहिरी यांनी गायलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. ‘शोले’ चित्रपटातील अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेले ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’, ‘याराना’ चित्रपटातील ‘तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना’ किंवा अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरील ‘दोस्ताना’ चित्रपटातील ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा’, ‘शराबी’ चित्रपटातील अमिताभ बच्चनवरील ‘जहाँ चार यार, मिल जाए वही रात हो गुलजार, मैहफील रंगीन जमे’ही गाणीही गाजली.
‘नमकहराम’ चित्रपटात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे ‘दिए जलते है फुल खिलते है, बडी मुश्कील से मगर दुनिया मे दोस्त मिलते है’ हे गाणेही ‘मैत्री’वरील लोकप्रिय गाणे. ‘सौदागर’ या चित्रपटात दिलीपकुमार आणि राजकुमार हे दोघे एकत्र होते.  चित्रपटात या दोघांवर चित्रित केलेले ‘इमली का बुटा, बेरी का पेड, इमली खट्टी, इमली खट्टी, मिठे बेर’ हे गाणे दिलीपकुमार व राजकुमार या दोघांच्याही चाहत्यांना आणि चित्रपट रसिकांनाही आवडले. बॉलीवूडमधील ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खानच्या ‘जो जिता वही सिंकदर’ चित्रपटातील ‘जवाँ हू यारो, तुमको हुआ क्या’, ‘दिल चाहता है’ चित्रपटातील आमिर खान, अक्षय खन्ना, सैफ अली खान यांच्यावरील ‘दिल चाहता है’, ‘थ्री इडियट’ चित्रपटातील आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यावरील ‘जाने नही देंगे तुझे’, ‘दोस्ताना’ चित्रपटातील ‘जाने क्यु’ही ‘मैत्री’ या विषयावरील गेल्या काही वर्षांतील गाणी. बॉलीवूडने ‘दोस्ती’ हा विषय नेहमीच आपला मानला आहे. त्यामुळे काळानुरूप आणि प्रत्येक पिढीबरोबर या विषयावरील गाणी व चित्रपट, त्याची मांडणी बदलत गेले. ‘दोस्ती’ ते ‘यारिया’हा बदल गेल्या काही वर्षांत प्रत्येकानेच अनुभवला आहे आणि यापुढेही बॉलीवूडमधून तो आपण अनुभवत राहणार आहोत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship in bollywood movies
First published on: 03-08-2014 at 12:40 IST