अनेक नातेसंबंधानी बनलेल्या या समाजात मैत्री हे एक नातं. मग या मैत्रीवर अनेक किस्से पडद्यावर रंगवले जाणे स्वाभाविकच. मराठी पडद्यावरील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाने साकार झालेला ‘फुगे’ चित्रपट हा त्यातीलच. दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या चित्रपटातून गैरसमजूतीमुळे समाजात निर्माण होणाऱ्या कथानकाला उत्तमपणे फुगविल्याचे दिसते. सुबोध आणि स्वप्नील यांचे अतुट नातेबंध दाखविण्यासाठी चित्रपटामध्ये करण-अर्जून चित्रपटाचा आधार घेण्यात आला आहे. ‘बंधन तो प्यार का बंधन है…’ हे चित्रपटातील सुरुवातीला वाजणाऱ्या गाण्याने याची प्रचिती येते.

समाजाचा आरसा दाखवून फुगविलेल्या या कहाणीची सुरुवात जुईच्या (प्रार्थना ठोंबरे) इतिहासाचा वारसा असणाऱ्या घरापासून सुरु होते. आदित्य (स्वप्नील जोशी) अग्निहोत्री घरातील वंशाचा दिवा. याच्यासोबत तिचे लग्न पक्के झालेले असते. सध्या आपल्याला मुलासोबत लग्न ठरल्यानंतर मुलाच्या होणाऱ्या बायकोला सूनबाई म्हणण्याचा ट्रेंड दिसून येतो. हे लक्षात घेऊन प्रार्थनाचे अग्निहोत्री कुटुंबात झालेले स्वागत त्या पद्धतीने झाल्याचे दिसते. आदिची आई ज्यावेळी जुईला आपल्या मुलाच्या लहाणपणीचे फोटो दाखवते तेव्हा प्रेक्षकांना जसा काही दिवसांपूर्वी स्वप्निलच्या लाल कपड्यातील लूकने आश्चर्याचा धक्का बसला, अगदी तशीच अवस्था चित्रपटात जुईची देखील झाल्याचे दिसते. यावेळीचा तिच्या चेहऱ्यावरील भाव हा पाहण्यासारखाच आहे. आदि (स्वप्निल जोशी) त्याच्या लहानपणीच्या सर्व फोटोमध्ये मुलीच्या वेशात दिसल्यामूळे ती गोंधळून जाते. जुईला या फोटोंचे स्पष्टीकरण देताना मुलगी होण्याची इच्छा असताना मुलगा झाल्यानंतर पालक आपले समाधान कसे मानून घेतात हे दाखविण्याचा दिग्दर्शिकेने प्रयत्न केला आहे.

याचवेळी तिची हृषीकेशशी (सुबोध भावे) झालेली ओळख आणि दोघात तिसरा अशा परिस्थिती चित्रपटाचे कथानक पुढे सरकते. आतापर्यंत पडद्यावर दिसलेल्या मैत्रीतील नात्यापेक्षा वेगळेपणाणे स्वप्नाने कथानक फुगविले आहे. दोस्तानाच्या रुपातून समलैंगिकतेवर भाष्य करताना दिग्दर्शिकेने त्यात स्त्री आणि-पुरुष अशा दोन व्यक्तिरेखा एका वेगळ्या अंदाजात मांडल्याचे दिसते. यापूर्वी हिंदी चित्रपटामध्ये समलैंगिकतेवर चित्रपट आले आहेत. मात्र या चित्रपटात अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने हा विषय मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे समलैंगिकतेच्या नात्यातील गोंधळाचे चित्र उभे करताना दिग्दर्शिकेने स्वप्निलला अभिनेत्रीच्या जागी तर सुबोधला अभिनेता म्हणून सादर केल्याचे दिसते. दोघांनीही त्यांच्या कसदार अभिनयातून त्यांना मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला आहे. चित्रपट समलैंगिकतेवर भाष्य करत असला तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहपरिवार हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांची तारांबळ होणार नाही, अशी अप्रतिम मांडणी केल्याचे मान्य करावे लागेल. गैरसमजूतीमुळे नात्यात आलेल्या वळणावर मनात निर्माण होणाऱ्या तरंगांची हवा उत्तमरित्या भरली असे म्हणता येईल. अभिनेते मोहन जोशी यांनी चित्रपटामध्ये हृषीकेशच्या (सुबोध भावे ) वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ते उपोषण, प्रांतवाद या घटनांना एका मजेशीर अंदाजात सादर करताना दिसले आहेत.  त्यांचे संवाद प्रेक्षकांना वास्तवात घडणाऱ्या घटनांशी जोडतील, अशी मांडणी करण्यात दिग्दर्शिकेला आणखी एकदा यश आल्याचे पाहायला मिळते.

प्रेमामध्ये तरुणींना असणाऱ्या अपेक्षा, दाखवून देताना प्रार्थनाने तिच्या भूमिकेला न्याय दिल्याचे दिसते. प्रेमाच्या कथेवर भाष्य करताना प्रेयसीसाठी कायपण करण्यास तयार असणाऱ्या तरुणाचा ‘स्मार्टनेस’ रंगविताना सोशल मीडियाच्या अॅलर्जीचा समावेश कथानकात केल्याचे दिसते. प्रेयसीचे म्हणजे जुईचे लग्न ठरल्यानंतर आदिचा वाढलेला घोर, त्याने फेसबुकच्या साहाय्याने जुईच्या होणाऱ्या नवऱ्याचा मिळविलेला नंबर हा त्याचाच एक भाग. या भेटीत समलैंगिकता, गांभीर्य, विनोद अशी त्रिसूत्रीकरणाची झलक पाहायला मिळते. चित्रपटामध्ये आदित्यच्या कुटुंबियांचा ऐतिहासिक वारसा दाखविताना घरातील राजेशाही भाषाशैली कानावर पडते. तर स्वप्नील आणि सुबोध भावेच्या जीभेवर आताच्या घडीला तरुणाईला आकर्षित करणारे शब्द ऐकायला मिळतात. दोन मित्रांच्यामध्ये प्रेयसीबद्दल होणाऱ्या गप्पांवेळी प्रेयसीच्या सुंदरतेला ‘टवका’ अशी उपमा देण्याचा प्रकार त्यातलाच. प्रेमाच्या गप्पा करताना तरुणाईमध्ये कट्ट्यावर केले जाणारे शब्द याच धाटणीचे असतात. त्यामुळे चित्रपटातील ही जोडी तरुणाईला साद घालण्यासाठीच आल्याचे भासते.

चित्रपटातील गाणी फारशी प्रभावी नसली तरी चित्रपटाच्या शेवटचे ‘पार्टी…’ हे गाणे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळवेल असे वाटते. चित्रपटात खलनायकाला देखील एका वेगळ्या पद्धतीने सादर केल्याचे दिसते. बॉलीवूडचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी छोटीशी भूमिका साकारली असून त्यांची भूमिका ही प्रेमात पाडणारी अशीच आहे. भैरप्पाच्या त्याच्या भूमिकेतून ‘एकच फाईट वातावरण ताईट, सगळेच म्हणतात भैराप्पा लय वाईट’ हा संवाद प्रेक्षकांना आकर्षित करेल.

एकूणच चित्रपटामध्ये विनोदाची, प्रेमाची आणि समाजातील घटनांचा बारकाईने विचार करुन ‘फुगे’  चित्रपटात हवा भरली आहे, असे म्हणता येईल. ‘फुगे’ हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद तरच देईलच, पण चित्रपटगृहातून बाहेर येताना स्वप्नील जोशीचा ‘मुद्दा काय आहे…’ हा एक नवा संवाद देखील तरुणाईला मिळेल.

दिग्दर्शिका- स्वप्ना वाघमारे जोशी

निर्मिती- अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी

कलाकार- स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, निशिकांत कामत,मोहन जोशी

 

सुशांत जाधव, sushant.jadhav@indianexpress.com