रेश्मा राईकवार
नात्या-नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यातली गंमत आगळी असते. त्यातही पती-पत्नीच्या नात्यातले ताणेबाणे आपल्याला बाहेरून कितीही वेगवेगळय़ा पद्धतीने जाणवत असले तरी त्यातली सत्यासत्यता फक्त त्या दोघांनाच माहिती असते. बाकी आपण त्यांच्याविषयी आपल्याला दिसणाऱ्या आणि ऐकलेल्या गोष्टींतून तर्कवितर्क लढवू शकतो. त्यातून मग वेगळीच गोष्ट रंगू लागते. कथाकथनाच्या अशा हुशार पद्धतीचा वापर करत चाळिशीतल्या चोरांच्या मनात सुरू असलेल्या उलाढाल्यांचा हलक्याफुलक्या पद्धतीने परामर्श घेण्याचा प्रयत्न लेखक विवेक बेळे आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ चित्रपटात करण्यात आला आहे.

‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा चित्रपट कथा-पटकथाकार विवेक बेळे यांच्या त्याच नावाच्या नाटकावर बेतलेला आहे. नात्यांचं बौद्धिक रंगवणारं कथानक ही या चित्रपटाची सशक्त बाजू आहे. एखादं कथासूत्र घेऊन ते वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करत त्यातून यात काहीतरी गोम आहे, काहीतरी दडलं आहे जे आपल्याला माहिती नाही असा आभास निर्माण करायचा. आणि मग त्या गोष्टीतल्या पात्रांबरोबर प्रेक्षकांना खेळवत ठेवायचं ही विवेक बेळे यांची कथनाची शैली हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. सात मित्रमैत्रिणींची गोष्ट या चित्रपटात आहे. यातली तीन विवाहित जोडपी आहेत आणि एक अविवाहित तरुण आहे. पराग-अदिती, डॉक्टर-सुमित्रा आणि वरुण-शलाका अशी ही तीन जोडपी आणि त्यांचा देखणा अजूनही अविवाहित असलेला मित्र अभिषेक. यांच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या करिअरमध्ये स्थिरावलेला आहे. घरसंसाराची घडीही नित्यनेमाने सुरू आहे. मुलं मोठी झाली आहेत, सगळे सुखवस्तू कुटुंबात नांदत आहेत. करिअर किंवा पैसे मिळवण्याचा तणाव वा त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सध्या तरी त्यांच्या आयुष्यात नाहीत. तर नेहमीप्रमाणे एका सकाळी कोणाच्या तरी फार्महाऊसवर सुट्टी मजेत घालवायची म्हणून ही सात मंडळी निघतात. फार्म हाऊसवर पोहोचतात. दिवसभराची मजा करून झाल्यावर रात्री पार्टी सुरू असताना अचानक घरातले दिवे जातात. आणि अंधारात कोणीतरी कोणाचं चुंबन घेतल्याचा आणि कोणीतरी कोणाला थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. या आवाजाबरोबर पार्टीचा रसभंग होतो आणि रात्रीच्या रात्री ही मंडळी आपापल्या घरी परततात. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. कोणी कोणाचं चुंबन घेतलं? आणि कोणी थोबाडीत मारलं? याचा शोध सुरू होतो. तसतशी वरवर छान दिसणाऱ्या या नात्यांची उसवलेली वीण आपल्याला दिसत जाते.

savarkar
सर्वसमावेशक दृष्टिकोन
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात

हेही वाचा >>>Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…

चाळिशीत पोहोचलेली ही मंडळी आयुष्यात एका निवांत टप्प्यावर आहेत. रोजची नोकरी-कामधंदा नीट सुरू आहे. त्यामुळे नेहमीच्या दैनंदिनीपेक्षा नवं काही तरी अनुभवायला मिळायला हवं ही ओढ त्यांच्या मनात आहे. आपापसातले विसंवाद त्यांना ज्ञात आहेत, फक्त ते एकमेकांकडे कबूल करण्याची त्यांची तयारी नाही. आपला जोडीदार कसा आहे? त्याचा स्वभाव कसा आहे? मित्रमैत्रिणींपैकी कोणाशी त्याचं खूप घट्ट जमतं आणि आपल्याला सोडून तो वा ती त्याला मनातलं कसं सगळं सांगून मोकळा होईल इतके एकमेकांविषयीचे बारकावे माहिती आहेत. त्यातूनही आपल्याला जे सोईचं आहे ते स्वीकारून मंडळी पुढे जात असतात. मात्र वरची घटना त्यांना हादरवून सोडते. सगळं माहिती असलं तरी काहीतरी आपल्या मागे सुरू आहे ही संशयाची सुई प्रत्येकाच्या मनात फिरायला लागते. त्यात आपापले जोडीदार घुसळून निघतातच.. पण मग याची जोडी त्याच्याशी करत.. मित्र आणि मित्राची बायको.. अशी ही सुई मनात अधिक खोल घुसत जाते आणि संशयाचे टाके विणत जाते. मन आणि बुद्धीचा हा खेळ टोकदार संवादांमुळे अधिक रंगतदार झाला आहे. कथा आणि त्या पात्रांमधलं हे भावनिक, बौद्धिक नाटय़ त्याच सहजतेने दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी पडद्यावर रंगवलं आहे. इथे कुठल्याही कलात्मक मांडणीच्या मोहात न पडता या चित्रपटाची सशक्त बाजू ओळखत तितक्याच उत्तम कलाकारांची निवड करून हे कथानाटय़ रंगवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न या चित्रपटाच्या पथ्यावर पडला आहे.

यातल्या तिन्ही स्त्री व्यक्तिरेखा कमाल आहेत. त्यात एकही सोशिक वगैरे नाही आणि तसा आवही आणत नाही. शलाका या तिघींमधलं अत्यंत हुशार पात्र आहे. प्रत्येकाची मानसिकता समजून घेत त्याला त्याच्या वागण्यातलं डावं-उजवं लक्षात आणून देण्याचं कसब तिच्याकडे आहे. इतरांच्या बाबतीत हुशार असलेली आणि कमालीचा समजूतदारपणा म्हणजे आयुष्य नाही हे तिच्या नवऱ्याने लक्षात आणून दिल्यावर क्षणभरासाठी का होईना विचारात पडणारी शलाका अभिनेत्री मधुरा वेलणकरने उत्तम रंगवली आहे. कुठल्याही चौकटी न मानणाऱ्या सुमित्राच्या भूमिकेत मुक्ता बर्वे चपखल बसली आहे. श्रुती मराठेने साकारलेली अदिती आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते. आनंद इंगळे, सुबोध भावे, अतुल परचुरे आणि उमेश कामत या तिघांनाही वेगवेगळय़ा ढंगाच्या व्यक्तिरेखांमधून पाहणं ही पर्वणी आहे. मूळ कथानक हे रंगमंचीय अवकाशाचा विचार करत बसवलेलं आहे. पडद्यावर पात्रं वेगवेगळय़ा ठिकाणी दिसत असली तरी त्यांच्यात होणारे संवाद हाच कथानक पुढे नेणारा धागा आहे. काहीसा शब्दबंबाळपणा आणि सतत विचारात टाकण्याची ही प्रक्रिया थकवणारी आहे. त्यात भावनिक नाटय़ाला फारसा वाव दिलेला नाही. पण कलाकारांचा अभिनय आणि एकमेकांमधील त्यांच्या मैत्रीचं रसायन, पात्रांची हलकीफुलकी मांडणी यामुळे थोडा दिलासा मिळतो. एक रंजक आणि वेगळा बौद्धिक खाद्य देणाऱ्या या गुहेत चाळिशीतल्यांनीच शिरायला हवं असं अजिबात नाही.

अलिबाबा आणि चाळिशीतले चोर

दिग्दर्शक – आदित्य इंगळे

कलाकार – मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे, श्रुती मराठे, अतुल परचुरे, सुबोध भावे, उमेश कामत आणि आनंद इंगळे.