मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळे चित्रपट प्रकार हाताळले जात असून, विषयवैविध्य मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. हे खरे असले तरी अनेकदा नावीन्यपूर्ण विषय असूनही मांडणी नीट न केल्यामुळे चित्रपट फसतात असे अधिक आढळून येते. ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाचेही असेच झाले आहे. कल्पना चमकदार असूनही गोष्टीचा मुख्य धागा अतिशय कच्चा, कमकुवत असावा याचे आश्चर्य वाटते. सरस कलावंतांची फौज असूनही निव्वळ बाष्कळ आणि बालिश विनोदांमुळे चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकत नाही.
प्रभाकर सावंत हा कोकणातल्या एका छोटय़ा गावातील पोस्टमन आहे. पोस्टमन असला तरी लोकांची पत्रं वाचायची त्याला खोड आहे. पोस्टकरड वाचणं आणि मग त्याचा बटवडा करणं हे प्रभाकर सावंतचेच नेहमीचेच. दुसऱ्यांची पत्रं वाचू नयेत असे प्रभाकरची बायको त्याला वारंवार सांगत,े पण ‘जित्याची खोड’ म्हणतात तसे प्रभाकरचे सुरू आहे. एकदा एका पोस्टकार्डावरचा मजकूर वाचून प्रभाकर सावंत हादरतोच. चक्क एका प्रेयसीने प्रियकराला लिहिलेल्या पत्रात प्रेयसीच्या नवऱ्याच्या हत्येचा कट लिहिलेला मजकूर त्याला सापडतो. माधव मेस्त्री नामक व्यक्तीचा खून होणार आहे हे त्याला समजते आणि मग माधव मेस्त्रीचा जीव वाचविण्यासाठी प्रभाकर सावंत नाना क्लृप्ती करतो.
कुणी कुणाच्या खुनाच्या कटाची योजना आखायची असेल तर ती गुप्त ठेवेल. गुप्त योजना कुणाला सांगायची असेल तर निदान त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून सांगेल. पण दूरवर राहणाऱ्या व्यक्तीला गुप्त योजना सांगायची असेल तर पत्र लिहिताना निदान अंतर्देशीय किंवा बंद पाकिटात लिहून कळवेल, पोस्टकार्ड कशाला लिहील. ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाचा मुख्य धागा पोस्टकार्ड हाच आहे आणि तोच अतिशय कच्चा, कमकुवत धागा आहे. परंतु याच कच्च्या पायावर दिग्दर्शकाने चित्रपट केला आहे. एखादा आडगावचा पोष्टमन ज्याला विरंगुळा म्हणून पोस्टकार्डावरचा मजकूर वाचण्याची सवय जडली आहे हे शक्य आहे, नव्हे अनेक पोष्टमन अशा प्रकारे पोस्टकार्डावरचा मजकूर वाचत असतीलही, हेही प्रेक्षकाला पटणारे आहे. पण खुनाच्या कटाची योजना कुणी पोस्टकार्डाद्वारे दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करील हे पटणारे नाही.
पोष्टमन प्रभाकर सावंतच्या डोक्यात माधव मेस्त्रीचा जीव वाचविण्याचा बेत तयार होतो, मग तो सावंतवाडीला जाऊन माधव मेस्त्रीचा शोध घेतो आणि त्याला तीन माधव मेस्त्री सापडतात. त्या तिघांनाही प्रभाकर सावंत पुन्हा पोस्टकार्ड टाकूनच तुमचा जीव धोक्यात असल्याचे कळवितो आणि तीन माधव मेस्त्री आणि त्यांच्या तीन बायका, संशय याभोवती चित्रपट फिरतो.
बालिश विनोद चित्रपटात अनेक ठिकाणी आहेत. तीनपैकी एक नवपरिणीत मेस्त्री आपल्या बायकोला म्हणतो, ‘काहीतरी बोल ना चांगलं काहीतरी’, यावर ती म्हणते ‘चांगलं’. स्टॅण्डअप कॉमेडीमधील विनोद चित्रपटात वरचेवर आहेत.
हृषीकेश जोशी यांनी पोष्टमनची मुख्य भूमिका साकारली आहे. प्रभावळकर, विकास कदम आणि संजय खापरे यांनी माधव मेस्त्री या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तर वंदना गुप्ते, मानसी नाईक आणि क्रांती रेडकर यांनी अनुक्रमे तिघांच्या बायकांची कामे केली आहेत. नारबाच्या वाडी चित्रपटाच्या संगीताची पुनरावृत्ती या चित्रपटात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मर्डर मेस्त्री
निर्माता – अब्रार नाडियादवाला, वैभव भोर
छायालेखक-दिग्दर्शक – राहुल जाधव
कथा – नेहा कामत
पटकथा-संवाद – प्रशांत लोके
संगीत – पंकज पडघन
कलावंत – हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, विकास कदम, मानसी नाईक, संजय खापरे, क्रांती रेडकर, किशोर चौगुले, कमलाकर सातपुते, श्रुती निगडे व अन्य.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny comedy
First published on: 12-07-2015 at 01:03 IST