नाटककार राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली आहे. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी मोजकीच नाटकं लिहिली असली तरी त्या नाटकांनी इतिहास घडवला. त्याकाळी नाटककार म्हणून जे गुण लेखकात असणे आवश्यक होते, ते सर्व गडकऱ्यांच्या ठायी ठासून भरलेले होते. तीव्र सामाजिक भान, पुरोगामी दृष्टिकोन, भाषेवर कमालीची हुकुमत, व्यक्तिरेखाटनातलं कौशल्य, नाटकाच्या तंत्र आणि मंत्राची अवगतता. त्यांना ‘शब्दप्रभू’ म्हटलं जातं ते त्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीच्या भराऱ्यांना लीलया शब्दरूप देण्याच्या त्यांच्या सिद्धहस्ततेमुळेच. त्यांचं पहिलं नाटक ‘गर्वनिर्वाण’- जे त्यांच्या हयातीत कधीच रंगभूमीवर येऊ शकलं नाही. १९०८ साली लिहायला घेतलेलं हे नाटक अनेकानेक कारणांमुळे त्याकाळी रंगमंचावर येऊ शकलं नाही. १९१० साली लिहून पूर्ण झालेल्या या नाटकाचं नाव गडकऱ्यांनी ‘प्रल्हादचरित्र’ असं प्रथम ठेवलं होतं. परंतु त्यांचे नाटय़क्षेत्रातले गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्याला ‘गर्वनिर्वाण’ हे नाव दिलं. किलरेस्कर नाटक मंडळी ते सादर करणार होती. परंतु त्याचदरम्यान ‘कीचकवध’ या नाटकावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा शिक्का मारून त्यावर बंदी घातल्यामुळे ‘गर्वनिर्वाण’वरही ब्रिटिश सत्तेचा रोष ओढवेल या भीतीनं गडकऱ्यांनी या नाटकातला काही आक्षेपार्ह भाग नष्ट केला. परिणामी हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही. पुढे १९१४ साली पुनश्च त्याच्या प्रयोगाचा घाट घातला गेला. त्यासाठी गडकऱ्यांकडून ते पुन्हा लिहून घेण्यात आलं. परंतु किलरेस्कर नाटक मंडळीतील बेबनावामुळे आणि अंतर्गत कलहापायी हे नाटक प्रकाशझोतात येण्यात पुन्हा एकदा बाधा आली. पुढे गडकऱ्यांनी इतर गाजलेली नाटकं लिहिली, तरी हे पहिलंवहिलं नाटक मागे पडलं ते पडलंच. गडकरी अल्पायुषी ठरल्याने पुढे या नाटकाचं काहीच झालं नाही. त्यांच्या पश्चात विनायक कोठीवाले यांना गडकऱ्यांची संहिता मिळाली आणि त्यांनी त्यात आपली भर घालून ती प्रसिद्ध केली. १९८५ साली गडकरी जन्मशताब्दीच्या निमित्ताने पहिल्यांदा ‘गर्वनिर्वाण’ या नाटकाला रंगमंचावर अवतरण्याचं भाग्य लाभलं. नाटककार विद्याधर गोखले यांनी विनायक कोठीवालेकृत ‘गर्वनिर्वाण’च्या संहितेची नवी रंगावृत्ती तयार करून ते गडकरी जन्मशताब्दी वर्षांत सादर केलं. त्याचे पस्तीसेक प्रयोगही झाले. आता पुनश्च एकदा हृषिकेश जोशी यांनी रा. शं. वाळिंबे यांना सापडलेल्या गडकऱ्यांच्या मूळ (?) प्रतीवरून ‘गर्वनिर्वाण’चा हा प्रयोग सिद्ध केला आहे. (त्यामुळे विनायक कोठीवाले यांना ‘गर्वनिर्वाण’चं बाड कुठं मिळालं, हा प्रश्न पडतो. तसंच रा. शं. वाळिंबे यांना सापडलेली ‘गर्वनिर्वाण’ची प्रत हीसुद्धा मूळचीच कशावरून, हाही आनुषंगिक प्रश्न उपस्थित होतो. संशोधकांना काथ्याकूट करण्याकरता हा विषय आपण सोपवलेला बरा.) ‘अष्टविनायक’ संस्थेतर्फे अलीकडेच हे नवे ‘गर्वनिर्वाण’ रंगमंचावर सादर झाले आहे. तर ते असो.
‘गर्वनिर्वाण’ हे गडकऱ्यांचं पहिलंवहिलं नाटक असल्यानं रसिकांना त्याबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक म्हणता येईल. परंतु प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्यावर मात्र नवथर लेखकाचा बाळबोधपणा गडकऱ्यांच्या या पहिल्या नाटकात प्रकर्षांनं जाणवतो. म्हणजे रंजक नाटकाचा फॉम्र्युला त्यात पुरेपूर आहे; परंतु नाटकावरची लेखकाची हुकुमत मात्र त्यात दिसून येत नाही. मैत्रेय भटजींसारख्या एखाद् दुसऱ्या पात्रामध्ये मात्र पुढच्या काळातील ‘सिद्धहस्त’ गडकरी डोकावतात. नाटकाची रचनाही बाळबोध आहे. एक गंभीर प्रसंग झाल्यावर दुसरा विरंगुळा म्हणून हास्यरसपरिपूर्ण प्रसंग अशीच एकंदर नाटकाची रचना केलेली आहे. या नाटकात गडकऱ्यांचे प्रेक्षकांच्या अभिरूचीसंबंधातले काही ठोकताळेही जाणवतात. प्रचलित नाटय़तंत्राचं व्याकरण त्यांनी ‘गर्वनिर्वाण’मध्ये घोटवलेलं दिसतं.
नाटकाची कथा पौराणिक आहे. हिरण्यकश्यपू-प्रल्हादाची ही कथा. दानवांचा राजा हिरण्यकश्यपूनं शंकराला प्रसन्न करून घेऊन अमरत्व प्राप्त केलं आणि त्यानंतर आता आपलं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, या गुर्मीत तो वागू लागतो. देव-दानव-पृथ्वीवरचे मर्त्य मानव हे सगळेच गुडघे टेकून आपल्या अंकित व्हावेत अशी आकांक्षा बाळगून अन्याय-अत्याचारांची परिसीमा गाठणारा हिरण्यकश्यपू आपला मुलगा प्रल्हाद हा दानवांचा शत्रू असलेल्या विष्णूची भक्ती करतो, हे त्याला सहन होत नाही. त्यामुळे संतप्त होऊन तो त्याला देहदंड फर्मावतो. परंतु भगवान विष्णू प्रत्येक वेळी प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता धावून आल्यानं त्याच्या शिक्षेचा बोजवारा उडतो. हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू त्याच्या या उन्मत्त, आसुरी वर्तनाबद्दल वेळोवेळी त्याला समजवायचा प्रयत्न करते. प्रत्यक्ष पोटच्या पोराशी शत्रुत्व करणाऱ्या हिरण्यकश्यपूला ती सावध करू पाहते. त्याला आत्मविनाशापासून वाचविण्याचा परोपरीनं प्रयत्न करते. परंतु मदांध हिरण्यकश्यपू काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतो. शेवटी विष्णू नृसिंहावतार धारण करून त्याचा वध करतो. सर्वपरिचित अशी ही गोष्ट या नाटकात सादर केलेली आहे.
राम गणेश गडकऱ्यांनी या नाटकात हिरण्यकश्यपूच्या रूपात दानवाच्या मनातही मानसिक-भावनिक द्वंद्व होत असतं हे दाखवलं आहे. हिरण्यकश्यपूला त्यांनी दानव असूनही ‘मानवी’ रूपात चित्रित केलं आहे. लोकपाल नामक पात्राकरवी राज्यव्यवस्थेचा नियंत्रक कसा असावा, याचंही उदाहरण त्यांनी घालून दिलं आहे. मैत्रेय भटजी या पात्राद्वारे ‘प्रेम’ या विषयालाही त्यांनी हात घातला आहे. म्हटलं तर हे पात्र ‘विनोदी’ या सदरात मोडत असलं तरी मदिरेबरोबरच्या त्याच्या प्लेटोनिक संबंधांचं सूचन गडकऱ्यांनी केलेलं आहे. मैत्रेय भटजी आणि त्यांच्या वाटय़ाला आलेल्या प्रसंगांतून गडकऱ्यांचा आगळा विनोद प्रत्ययाला येतो. प्रसंगनिर्मितीतील त्यांची योजकता त्यातून जाणवते. पुढे महान नाटककार म्हणून वाखाणले गेलेले गडकरी उमेदवारीच्या काळातही व्युत्पन्नमती होते याचा वानवळा त्यातून मिळतो.
हृषिकेश जोशी यांनी नाटक सुविहित बसविले आहे. प्रत्येक प्रवेशातली नाटय़पूर्णता उठावदार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. तथापि दस्तुरखुद्द गडकऱ्यांनाच रंगमंचावर आणून त्यांच्याकरवी आपल्या या प्रयोगाची भलामण करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न खचितच उचित नव्हे. त्याचप्रमाणे दुसऱ्या अंकाच्या प्रारंभास हिरण्यकश्यपू वगळता अन्य कलाकारांना आधुनिक पेहेरावात रंगमंचावर आणण्यातलं प्रयोजन कळत नाही. ‘प्रयोगा’साठी केलेला हा ‘प्रयोग’ काहीच साध्य करत नाही. उलट, त्यानं प्रेक्षकांचा रसभंग मात्र होतो. या ‘प्रयोगा’त कुठलंही नवं अर्थनिर्णयन नाही. दिग्दर्शकाच्या मनात कदाचित काही असलंच, तरी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, हे नक्की. बरं, एकदा आधुनिक वेशभूषा स्वीकारल्यावर पुढचा सगळा अंक तसाच करावा ना? तर तेही नाही. लगेचच्या प्रवेशात पुन्हा सगळे कलाकार मूळ पेहेरावात परततात. त्यामुळे या ‘प्रयोगा’ला अट्टहासापलीकडे दुसरं काहीच म्हणता येणार नाही. अर्थात नाटकाचा प्रयोग सफाईदार होतो. प्रदीप मुळ्ये यांची स्तरीय नेपथ्यसंकल्पना आणि प्रकाशयोजना नाटकाच्या निर्मितीमूल्यांत निश्चितच भर घालते. नरेंद्र भिडे यांनी नाटकातील पदांना न्याय दिला आहे. परंतु ती प्रेक्षकांच्या मनात कायम घोळत राहत नाहीत. सोनिया परचुरेंची नृत्यरचना आणि पूर्वा जोशी यांची वेशभूषा नाटकाच्या यथार्थतेला अनुरूप आहे.
अजय पूरकर यांनी हिरण्यकश्यपूचं मदांध, उन्मत्त रूप उत्तम साकारलं आहे. गाण्यांतही त्यांची हुकुमत जाणवते. कयादू झालेल्या सावनी दातार-कुलकर्णी यांनी पुत्र व पती यांत होणारी तिची कुतरओढ, दोघांना एकमेकांजवळ आणण्याचा तिचा आटापिटा आणि त्यात होणारी तिची फरफट प्रत्ययकारीतेनं दर्शविली आहे. गाण्यांतही त्या सहज, मोकळ्या गळ्यानं पदं सादर करतात. प्रल्हादच्या भूमिकेतला सृजन दातार हा मात्र त्याच्या गेटअपमुळे मुलीसारखा भासतो. अभिनयाशी त्याची ओळख नसावी. तो गातो मात्र छान. अविनाश नारकरांनी लोकपालचा आब, त्याची कर्तव्यतत्परता यथायोग्य साकारलीय. प्रसाद ओक यांचा मैत्रेय भटजी भन्नाट. जेश्चर-पोश्चरमधून त्यांनी अपेक्षित परिणाम साधला आहे. शार्दुल सराफ यांनी गडकऱ्यांचं तसंच वैद्य वाग्भटाचं पात्रही छान रंगवलं आहे. अंशुमन जोशी (चरक) यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. या दोघा वैद्यांचा विषाचा प्रवेश मस्त रंगलाय. केतकी सराफ (मदिरा), मानसी जोशी (वारुणी) आणि शुभंकर तावडे (दुर्गपाल/ नरसिंह) यांनीही आपली कामं चोख केली आहेत.
गडकऱ्यांचं लेखक म्हणूनचं नवथरपण आणि प्रयोग सादरीकरणातला ‘प्रायोगिकते’चा सोस असूनही ‘गर्वनिर्वाण’चा हा प्रयोग एक सुविहित संगीत नाटक पाह्य़ल्याचं समाधान नक्कीच देतो.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2014 रोजी प्रकाशित
सफाईदार ‘गर्वनिर्वाण’
नाटककार राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली आहे. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी मोजकीच नाटकं लिहिली असली तरी त्या नाटकांनी इतिहास घडवला.

First published on: 25-05-2014 at 04:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garva nivaran marathi play