मी गर्लफ्रेंड पटवणारच..पासून नच्या गॉट गर्लफ्रेंडसारख्या संवादांनी, व्हीडिओजनी सध्या एकच धुमाकूळ घातला आहे. तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय तितक्याच प्रेमाने मांडणाऱ्या उपेंद्र सिधये दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी अनोख्या पद्धतीने प्रसिद्धी करण्यात आली आहे. या चित्रपटानिमित्ताने नच्या आणि नच्याच्या गर्लफ्रेंडच्या गोष्टीमागे नक्की काय विषय दडला आहे, याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक उपेंद्र सिधये, नच्या ऊर्फ अमेय वाघ आणि त्याची गर्लफ्रेंड सई ताम्हणकर, अभिनेत्री रसिका सुनील, निर्माते अनिश जोग आणि माध्यम सल्लागार विनोद सातव यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या खास भेटीत सांगितली..

भारतात तरुणांचे सध्या तीन मोठय़ा समस्या आहेत. एक म्हणजे शिक्षण महाग झाले आहे. दुसरी बेरोजगारी आहे आणि तिसरे मुलांना गर्लफ्रेंड मिळत नाहीत, मुलींना बॉयफ्रेंड मिळत नाहीत. तर ही जी तिसरी समस्या आहे, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आपण अशा काळात जगतो आहे जिथे समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव आहे. तुम्ही कसे आहात हे तुमच्या मूळ स्वभावावरून नाही तर तुमची समाजमाध्यमांवरची प्रतिमा काय आहे यावरून ठरतं. आम्ही तर कलाकार आहोत आणि तरीही आमची प्रतिमा काय आहे यावरून आम्ही कसे आहोत याची चाचपणी केली जाते. सामान्य माणूसही या गोष्टीला अपवाद नाही, कारण समाजमाध्यमांना तुमच्यापासून वेगळं काढलं जाऊ शकत नाही. लोकांकडे हल्ली एकवेळ आधारकार्ड नसेल, पण त्यांचं फेसबुक-इन्स्टाग्राम अकाऊंट नक्की असतं. या सगळ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे, आणि तो फक्त पुरुषांच्या नाही तर स्त्रियांच्या दृष्टीकोनातूनही भाष्य करतो. जे प्रेमात आहेत, जे प्रेमात पडत नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा चित्रपट आहे.

आपण सध्या अशा वातावरणात आहोत, जिथे कामाच्या खूप संधी आजूबाजूला उपलब्ध आहेत. आपण आपल्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून काम करत राहिलं पाहिजे, त्याची एक वेगळी नशा असते, असं मला वाटतं. प्रायोगिक -व्यावसायिक नाटकांमध्ये मी रमतो कारण माझी जडणघडण, माझं सगळंच तिथून आहे. चित्रपट हे माध्यम मला अजूनही आव्हानात्मक वाटतं. कॅ मेऱ्यासमोर काम करणं हे अजूनही तितकं आपलंसं वाटत नाही. युटय़ूब हे माध्यम जे आम्ही सध्या ‘भाडिपा’च्या निमित्ताने हाताळतो आहोत ते तर अगदी आपल्या हातातलं माध्यम वाटतं. अनेक असे विषय आहेत जे टीव्हीवर मांडणं शक्य नाही ते आम्ही खूप सहज म्हणून यातून मांडत गेलो आणि आता त्याला मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे. समाजमाध्यम हे प्रसिद्धी-संपर्काचं योग्य माध्यम!

समाजमाध्यमांबद्दल मी सुरुवातीला आळशी होतो, तिथे छायाचित्रं टाकणं वगैरे प्रकार मला फारसे आवडायचे नाहीत. पण ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सुरू असताना माझ्या ‘दळण’ या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग होता आणि त्याची पोस्ट मी टाकली होती. माझ्या लक्षात आलं की त्या एका पोस्टमुळे माझं नाटक हाऊसफुल्ल  झालं. एक मोठा वर्ग असा आहे जो वर्तमानपत्रांतून जाहिराती पहात नाही, त्यांना समाजमाध्यमांवरून कार्यक्रमांबद्दलची माहिती मिळते. त्यामुळे हे प्रसिद्धीचं खूप चांगलं माध्यम आहे, यावर माझा विश्वास बसला.     – अमेय वाघ

 

माझा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. पहिलाच चित्रपट हा रोमँटिक शैलीचा असेल असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी आजवर ज्या पद्धतीचे चित्रपट लिहिले होते ते सगळे विषय वेगळ्या शैलीचे होते. पण असं काही ठरवून होत नाही, शेवटी तुम्हाला जे सुचतं ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता. ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाचा विषय म्हणाल तर समाजाचे काही मापदंड असतात, तुम्ही या वयात असं वागलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे. या ज्या काही चौकटी असतात त्यात न बसणाऱ्या अशा काही व्यक्ती असतात म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही. तर काहीजण स्वत:ला त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात. याचं सोपं उदाहरण सांगायचं झालं तर पाचजण एकत्र बोलत असतील आणि त्यातल्या चौघांनी सांगितलं की आम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघितला. आणि एकाने नाही सांगितलं तर त्याच्याकडे ज्या नजरेने बघितलं जातं ते पाहून तो घाबरतो. अरे बापरे आपण काहीतरी चूक केली आहे आणि केवळ त्या विचारापोटी तो गेम ऑफ थ्रोन्स बघतो. हा समाजाकडून विशेषत: समाजमाध्यमातून येणारा दबाव आहे. आपण फेसबुकवर जातो, पोस्ट्स बघतो आणि त्यांची छायाचित्रे, लाइक्स बघून अरे यांचं किती छान चाललंय या विचाराने अस्वस्थ होतो. उगाचंच काही नसताना आपल्या मनात एक न्यूनगंड तयार होत जातो. माझ्या मित्राला खूप लाइक्स मिळाले आहेत, कारण त्याने मतदान केल्याचं छायाचित्र टाकलं आहे. मीही मतदान केलं आहे, मग मीही टाकतो म्हणजे मला जास्त लाइक्स मिळतील. हे सगळं मनाच्या सुप्त पातळीवर घडत असतं. जे इथे नचिकेतच्या बाबतीत आहे. त्याचं बाकी सगळं छान चाललं आहे, पण त्याला असं वाटायला लागतं की त्याच्या आयुष्यात ज्या समस्या आहेत त्या केवळ गर्लफ्रेंड नसल्यामुळे आहेत. म्हणून मग तो गर्लफ्रेंड पटवायचं ठरवतो. आणि मग तो खरंच सुखी होतो का गर्लफ्रेंड पटवून.. याचं उत्तर चित्रपटात मिळेल. ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे आशयनिर्मितीबाबत एक योग्य स्पर्धा निर्माण होईल, असं मला वाटतं. तुमचा आशय चांगला नसेल तर तो पाहिला जाणार नाही, त्यामुळे उत्तम चित्रपट देणं ही आमचीही जबाबदारी वाढेल. शिवाय, चित्रपट हे समूहाने पाहण्याचं माध्यम आहे. चारशे-पाचशे लोक एकत्र बसून एका कथेचा आनंद घेतात, वेबसीरिज हे अजूनही मोबाइलवर एकटय़ानेच पाहिला जाणारा आशय आहे.     – उपेंद्र सिधये, दिग्दर्शक

 

अलिशा नेरुरकर ही माझी व्यक्तिरेखा आहे. अलिशा ही गूढ आहे. चार मुलींपेक्षा वेगळी आहे, थोडीशी विचित्र आहे आणि तिचा विचित्रपणा हवाहवासा आहे. इतकी वर्ष काम केल्यानंतरही माझ्यातून अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा बाहेर येत आहेत, याचा मला आनंद आहे.  ओटीटी प्लॅटफॉम्र्स वाढले असले तरी त्याची चित्रपटांना थेट स्पर्धा नाही, असं मला वाटतं. कारण आपल्याक डे चित्रपट पाहणं ही एक संस्कृती आहे, ती सहज मिटणारी नाही.     – सई ताम्हणकर 

 

ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा हा प्रवाह आहे तोही इतर माध्यमांसारखाच स्थिरावेल. आपल्याकडे जेव्हा टीव्ही आला तेव्हा आता चित्रपट बघायला कोण जाणार? सगळे टीव्हीसमोरच बसणार अशा चर्चा झाल्या होत्या. पण आता ही दोन्ही माध्यमे स्थिरावली आहेत. टीव्हीवरचा आशय एका पद्धतीचा आहे आणि चित्रपटाचा वेगळा आहे हे स्पष्ट झालं आहे. मराठी चित्रपट निर्मिती करताना अर्थकारण लक्षात घेतलंच पाहिजे. एका मर्यादेपलीकडे जाऊन निर्मात्यांना खर्च करता येत नाही, कारण त्याची वसुली होणं शक्य नसतं.      – अनिश जोग, निर्माता

 

अमेय आणि सईचं काम मी पहात आले आहे. या दोघांबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. सेटवर या दोघांना काम करताना बघणं हा खूप शिकवून जाणारा अनुभव होता.     – रसिका सुनील

 

गेल्या तीन वर्षांत मराठी चित्रपट निर्मितीचा आकडा कमी होत गेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. सध्या मराठीमध्ये जे सातत्याने चित्रपट निर्मिती करणारे निर्माते आहेत त्यांना  निर्मितीचं एक शास्त्र कळलेलं आहे.  सध्या प्रेक्षक चित्रपट कुठल्या दिग्दर्शकाचा, कुठल्या लेखकाचा आहे हे आवर्जून बघतात. याशिवाय, चित्रपटांच्या वितरणाच्या दृष्टीने विचार करताना उर्वरित मुंबई-पुण्यापलिकडेही विचार केला पाहिजे. सध्या ‘टकाटक’ हा चित्रपट उर्वरित महाराष्ट्रात गर्दी खेचतो आहे. त्यामुळे इथे मुरांबा चालतो, मुळशी पॅटर्न चालतो, टकाटकही चालतो. आशयात वैविध्य असणारे चित्रपट चालत आहेत. फक्त चांगले लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि उत्तम प्रसिध्दी करणारे ही टीम जुळून आली पाहिजे.   – विनोद सातव, माध्यम सल्लागार