…म्हणून रिमीनं अभिनयापासून दूर जाण्याचा घेतला निर्णय

गाजलेल्या विनोदी चित्रपटांमध्ये रिमी सेननं भूमिका साकारल्या. तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांची दाद मिळाली. तरीही ती अचानक पडद्यावरून गायब का झाली हा प्रश्न अनेकांना पडला होता.

rimi sen
रिमी सेन

‘हंगामा’, ‘गोलमाल’, ‘बागबान’, ‘धूम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री रिमी सेननं भूमिका साकारली. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजले. मग अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करूनसुद्धा ती अचानक पडद्यावरून गायब का झाली हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर आता स्वत: रिमी सेननंच दिलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात रिमीने आपण अभिनयाला रामराम का ठोकलं हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट केलं.

‘मला चित्रपटांचे ऑफर्स येत होते, म्हणून मी काम करत गेले. मात्र, आता मी अभिनय करणार नाही. कारण एक वेळ अशी आली की, जेव्हा मी माझ्या कामाचा आनंद घेऊ शकत नव्हते. विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून मी थकले. म्हणून मी अभिनय क्षेत्र सोडून दिलं,’ असं तिने सांगितलं.

वाचा : वेळोवेळी साथ दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी, सलमानची भावूक पोस्ट 

रिमी सध्या अभिनयापासून दूर गेली असली तरी ती चित्रपटसृष्टीशी सातत्याने जोडली गेली आहे. कारण दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्राचा ती विचार करत आहे. ‘बुधिया सिंह: बॉर्न टू रन’ या चित्रपटाची निर्मिती तिनं केली होती. धावपटू धावपटू बुधियाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. २०१५ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

Video: शाहिद कपूरच्या भावाचा अफलातून डान्स पाहाच!

२००३ मध्ये ‘हंगामा’ या चित्रपटातून रिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘बागबान’, ‘दिवाने हुए पागल’, ‘धूम’, ‘गोलमाल अनलिमिटेड’, ‘फिर हेराफेरी’, ‘गरम मसाला’, ‘क्योंकी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं भूमिका साकारली. २०११ मध्ये आलेला ‘शागिर्द’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Golmaal actress rimi sen explains why she left acting