एखाद्या जोडप्याचं काहीही कारणांनी परस्परांशी जमलं नाही तर गोष्टी विवाह विच्छेदापर्यंत जातात. त्यात त्या दोघांची फरफट तर होतेच, पण त्यांच्या कुटुंबीयांचीही ससेहोलपट होते. त्याहून अधिक त्यांच्या मुलांचे जे भावनिक, मानसिक आणि कौटुंबिक हाल होतात, त्याला तर परिसीमाच नाही. परंतु त्यांचा विचारच या सगळ्या प्रक्रियेत होत नाही. त्यांना गृहीत धरलं जातं. आई-वडलांच्या बेबनावात ते बळीचे बकरे बनतात. त्याचे त्यांच्या पुढील आयुष्यावर कोणते भयावह दुष्परिणाम होतात हा सर्वेक्षणाचा विषय ठरावा.
…तर याच विषयावर आधारलेलं ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे डॉ. नरेश नाईक लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. ‘रंगनील’ या संस्थेची ही निर्मिती आहे.
सुशीला ही घटस्फोटित मध्यमवयीन स्त्री. मनोहर देशपांडे या गृहस्थाच्या पत्नीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगा आहे- श्रीधर… श्री! सुशीलालाही आधीच्या लग्नापासूनची एक मुलगी आहे… ‘कांचन’ नावाची. सुशीला-मनोहर या दोघांचं नुकतंच लग्न झालंय. साहजिकपणेच नव्या नात्यात रुळताना दोघांनाही आणि त्यांच्या मुलांनाही अडखळायला होतंय. नवे आई-बाबा स्वीकारताना मुलांना जास्तच त्रास होतोय. पण हळूहळू तेही हे नवं नातं पचनी पाडून घेण्याच्या प्रयत्नांत आहेत. याच दरम्यान सुशीलाचा पूर्वीच्या लग्नापासून झालेला मुलगा विनय अचानकपणे या घराचा पत्ता शोधत येऊन थडकतो. लहानपणीच त्याने आपल्याला वडलांकडे राहायचंय म्हणून सांगून आईचा हात सोडलेला आहे. त्यानंतर त्याचे वडील सुशीलाला न सांगतासवरता त्याला घेऊन कोलकात्याला गेलेले. त्यामुळे तेव्हापासून माय-लेकाचा काहीच संपर्क राहिलेला नसतो. सुशीला त्याला हुडकण्याचा खूप प्रयत्न करते. पण त्याचा ठावठिकाणा लागत नाही. यथावकाश वर्षे लोटतात. आता सुशीलाने मनोहरशी पुनर्विवाह केल्यानंतर अचानकपणे विनय पंधरा वर्षांनी त्यांच्या घरी येऊन धडकतो. आणि मी आईला माझ्या घरी न्यायला आलोय असा हट्ट धरून बसतो. सुशीला नुकतंच लग्न झालेलं असल्याने नव्या नात्यांत स्थिरस्थावर व्हायच्या प्रयत्नांत असतानाच आता आणखी हे काय नवंच खटलं- म्हणून सुरुवातीला या प्रकाराने पार गोंधळून जाते. नंतर काहीसं त्या धक्क्यातून सावरल्यानंतर ती विनयला समजवायचा प्रयत्न करते की, माझं आता लग्न झालंय, नवी नाती मी जोडते आहे, त्यात आता तू येऊन नवे पेच निर्माण करू नकोस. पण तो हट्टालाच पेटलेला असतो, की तू माझी आई आहेस आणि मी तुला न्यायला आलोय… आपल्या घरी. आता काय होणार या भीतीनं सुशीला अर्धमेली होते. तेवढ्यात अण्णा (मनोहर) घरी येतात. आणि विनयला घराबाहेर पाहून त्याची चौकशी करतात. त्याला घरात घेतात. विनय आपण आपल्या आईला आपल्या घरी न्यायला आल्याचं त्यांना सांगतो. ते त्याचं सगळं शांतपणे ऐकून घेतात आणि त्याला सांगतात- ‘तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता सुशीलाने नवं लग्न करून संसार थाटलाय. त्यामुळे ती तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. त्याऐवजी तूच इथे आईबरोबर चार दिवस राहा. पण विनय म्हणतो – मी कुणाच्या घरी राहायला आलेलो नाही. मी माझ्या आईला न्यायला आलोय. तो आपला हट्ट जराही सोडत नाही. सगळेच जण त्याच्याबरोबर बोलून बोलून थकतात. त्याला शेवटी कायद्याची भाषाही ऐकवतात. पण तो आपल्या निश्चयावर अढळ राहतो. मी आईला घेतल्याशिवाय जाणार नाही, हाच त्याचा हट्टाग्रह असतो. तो त्यांच्याशी हरतऱ्हेने वाद घालतो आणि सगळ्यांनाच निरुत्तर करतो.
या वादाचा शेवट काय होतो हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.
लेेखक डॉ. नरेश नाईक यांनी घटस्फोटितांच्या मुलांचा प्रश्न अत्यंत पोटतिडकीनं या नाटकात मांडला आहे. ज्याची उत्तरं जगण्यातील नैतिकता किंवा कायद्याच्या भाषेतसुद्धा मिळणं अवघड. एखाद्या जोडप्याने घटस्फोट घेतल्यावर त्यांच्या मुलांचा ताबा सारासार विचार करून न्यायालय आई किंवा वडलांकडे देते. परंतु मुलांना आई-वडील दोघंही हवे असतात. त्यांच्या निकोप वाढीसाठी दोघंही तितकेच गरजेचे असतात. पण न्यायालय निर्णय देऊन कुणा एकाकडे त्यांना सोपवतात. त्यामुळे त्यांची भावनिक आणि मानसिक कुचंबणा होते. काही मुलं या परिस्थितीशी नाइलाजानं जुळवून घेतात. काहींना प्रयत्न करूनही ते जमत नाही. त्यांच्यावर या सगळ्याचे अनेकानेक दुष्परिणाम होतात. याला जबाबदार कोण? या मुलांची जी वाताहत होते, परवड होते, त्याने त्यांची आयुष्यं गर्तेत जातात. अशा मुलांचं प्रातिनिधिक म्हणणं मांडणारं हे नाटक आहे. लेखकानं यातले तिढे साकल्याने मांडले आहेत. पण सुशीला-मनोहरसारख्या पुनर्विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यातून कुणीच मार्ग काढू शकत नाही. या नाटकाचा शेवट जरी सकारात्मक दाखवलेला असला, तरी नेेहमीच तो तसा होईल असं नाही. लेखकानं हे अत्यंत इन्टेन्स नाटक पुन्हा पुन्हा त्याच त्या वळणावर आणून ठेवलं आहे… जिथून परतीचा कुठलाच मार्ग उपलब्ध नाही.
त्यामुळे एका विशिष्ट क्षणानंतर नाटक पुढे सरकतच नाहीए असं वाटायला लागतं. ही या नाटकातल्या प्रश्नाची कोंडी आहे. ज्याचं उत्तर कुणापाशीही नाही. लेखकानं यातली सगळी पात्रं ठसठशीतपणे रेखाटली आहेत. अगदी सोसायटीच्या वॉचमनचंही! त्यांच्यातले परस्परसंबंध नीट, नेमकेपणाने प्रस्थापित केले आहेत.
दिग्दर्शक राजन ताम्हणे यांनी हे आशयप्रधान नाटक समजून उमजून बसवलं आहे. सगळी पात्रं स्वाभाविकपणे आकारली आहेत. पण प्रश्न आहे तो यात निर्माण झालेल्या कोंडीचा! त्यातून जे जे पर्याय अपेक्षित आहेत, ते करून संपल्यावर पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ही कोंडी त्यांनी तीव्रतर केली आहे. एका क्षणानंतर तर बोलणंच संपतं. प्रेक्षकही कोंडीत सापडतात. पण…
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी मनोहर देशपांडे यांचा प्रशस्त, हवेशीर फ्लॅट बाहेरील लिफ्टसह तपशिलांत उभा केला आहे. राजन ताम्हणे यांनी प्रकाशयोजनेतून नाट्यात्म प्रसंग ठळक केले आहेत. तर परिक्षित भातखंडे यांनी नाटकातील संघर्षपूर्ण मूड्स पार्श्वसंगीतातून अधोरेखित केले आहेत. मंगल केंकरे यांची वेशभूषा पात्रानुकूल. शरद सावंत यांची रंगभूषाही पात्रांना उठाव देणारी.
अदिती देशपांडे यांनी घटस्फोटानंतर काही काळाने पुनर्विवाह केलेल्या सुशीलाची संभ्रमित मन:स्थिती आणि त्यानंतर पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा विनय हा अचानकपणे घरी धडकल्यानंतर आणि त्याने तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट जाहीर केल्यानंतर तिची झालेली घाबरलेली, राग, हतबलता, उद्विग्नता आणि कोंडीत सापडल्याची भावना सहजोत्कटतेने व्यक्त केल्या आहेत. सुशीलाचे हे भावकल्लोळ नाटकातला ताण वाढवतात. विनयच्या अचानक येण्याने गोंधळलेले, आधी त्याला समजुतीने घेणारे आणि नंतर त्याच्या अवाजवी हट्टापायी हताश, निराश होऊन प्रचंड संतापलेले मनोहर तथा अण्णा- राजन ताम्हणे यांनी सर्वतोपरी उभे केले आहेत. आपला आईवरचा हक्क येनकेनप्रकारे बजावू पाहणारा आणि त्याकरता बिनतोड युक्तिवाद करणारा, हट्टी, जिद्दी विनय- संग्राम समेळ यांनी त्याच्या सगळ्या छटांसह समूर्त केला आहे. एका विशिष्ट क्षणानंतर त्याची चीड यावी आणि तो म्हणतोय त्यात तथ्यही आहे हे जाणवून प्रेक्षकही हतवीर्य व्हावेत… यातून त्यांची इन्टेन्सिटी कळून येते. अपर्णा चोथे यांनी कौन्सिलर शमाच्या भूमिकेत सामंजस्यपूर्ण तडजोडीची पराकाष्ठा केली आहे. प्रसाद बेर्डे (श्रीधर) आणि वरदा देवधर (कांचन) यांनी आपली कामं चोख केली आहेत. वॉचमन झालेले अनिकेत गाडे छोट्याशा भूमिकेतही लक्ष वेधून घेतात.
आजच्या समाजातील एका भीषण, हृदयद्रावक समस्येला हात घालणारं हे नाटक प्रेक्षकाला हलवून सोडतं, हे नक्की.