‘मुझे शिकायत है समाज के उन ढांचो से,
जो इन्सान से उनकी इन्सानियत छिन लेती है,
दोस्त का दुश्मन बनता है, इन्सानों को पैरोतले रौंदा जाता है,  
जहाँ किसी के दु:ख दर्दपर आंसू बहाना बुझदिली समझ जाती है
ऐसे माहोल में मुझे कभी शांती नहीं मिलेगी
मैं दूर जा रहा हूं..
हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या ‘प्यासा’ चित्रपटातील ‘विजय’च्या तोंडी असलेला हा संवाद जणू काही हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘शापित गंधर्व’ गुरुदत्त यांच्या वास्तवातील आयुष्यातही तंतोतंत लागू पडतो आणि म्हणूनच की काय वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी जीवनाचा शेवट केला आणि या जगातून ते कायमचे निघून गेले. त्यांच्या निधनाला पन्नास वर्षे झाली. मात्र तरीही गुरुदत्त यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय, त्यांचे दिग्दर्शन आणि त्यातील गाणी, गाण्यांचे चित्रीकरण यांचे गारुड चित्रपट रसिकांवर आजही कायम आहे.        
गुरुदत्त नावाचे गारुड
गुरुदत्त यांचे मूळ नाव ‘वसंतकुमार शिवशंकर पदुकोण’ असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीत ते ‘गुरुदत्त’ या नावाने ओळखले जायचे. स्वत:च्या ‘गुरु दत्त फिल्म कंपनी’च्या माध्यमातून विविध विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली असली तरी ‘गुरुदत्त’ हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर ‘प्यासा’, ‘कागज के फुल’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटांची नावे प्रामुख्याने येतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील या ‘शापित गंधर्वा’ने अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटविला पण चित्रपटांच्या माध्यमातून शोकांतिकेला त्यांनी ग्लॅमर प्राप्त करून दिले. काही वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने जगातील सवरेत्कृष्ट १०० चित्रपटांची यादी जाहीर केली होती, त्यात गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’चा समावेश होता.
गुरु दत्त यांनी १९४४ ते १९४७ या कालावधीत पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत नृत्यदिग्दर्शक आणि साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला काम केले होते. याच दरम्यान त्यांची देव आनंद आणि रहेमान यांच्याशी ओळख व पुढे चांगली मैत्री झाली आणि यातूनच गुरु दत्त हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळले. गुरुदत्त चित्रपटातील प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने पाहात असत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट मग तो एखादा प्रसंग, संवाद, छायाचित्रण, संगीत किंवा गाणी असोत, ती काही तरी वेगळेपण घेऊनच आली. गाण्यांच्या चित्रणावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील नायक हे दु:खी दाखविले आहेत. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब बीबी और गुलाम’ आदी चित्रपटांतून त्यांनी सामाजिक विषमता, बेगडी नाती, प्रेमाचे खरे आणि खोटे स्वरूप, महिलांचे होणारे शोषण यांना वाचा फोडली.
गाण्यांवरही ठसा
गुरु दत्त यांच्या चित्रपटातील (त्यांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय असलेले किंवा त्यांनी दुसऱ्या चित्रपटनिर्मिती संस्थेसाठी दिग्दर्शित केलेले चित्रपट असो) सर्वच गाणी खूप लोकप्रिय झाली. यात त्या गाण्याचे गीतकार, गायक, संगीतकार यांचा मोलाचा वाटा आहेच, तसाच वाटा गुरुदत्त यांच्यातील दिग्दर्शकाचाही आहे हे विसरून चालणार नाही. ‘प्यासा’ चित्रपटातील ‘हम आपकी आखों में इस दिल को जगह दे तो’ हे गाणे गुरुदत्त आणि माला सिन्हा यांच्यावर चित्रित झाले. गाण्याचे चित्रीकरण झाल्यानंतर ते चित्रपटातून काढून टाकायचे असे गुरुदत्त यांनी ठरविले होते, असे म्हणतात पण वितरकांच्या आग्रहामुळे ते ठेवले गेले. आजही हे गाणे लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटातील हे पहिले ‘ड्रीम सिक्वेन्स’ गाणे असल्याचे मानले जाते. याच चित्रपटातील ‘जीन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ है’ हे गाणेही वेगळ्या धाटणीचे आहे. चित्रपटातील ‘विजय’ वेश्या वस्तीत आला असून त्याला तेथील वातावरण सहन होत नाही. स्वत:च्या झालेल्या अध:पतनामुळे तो दुखावला गेला आहेच, पण समाजाच्याही झालेल्या अध:पतनाचे दु:ख या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त झालेले पाहायला मिळते. ‘प्यासा’ चित्रपटातील ‘जाने क्या तुने कही’ या गाण्याच्या सुरुवातीला गुरुदत्त ‘मैने कहाँ’ असे गीता दत्तला विचारतो आणि लगेच गाणे सुरू होते.  
‘कागज के फूल’मध्ये त्यांनी मायावी दुनियेतील कटू सत्य मांडले. या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेमास्कोप’ तंत्रज्ञान हिंदीत पहिल्यांदा वापरले गेले. या चित्रपटातील ‘वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे ना तुम हम रहे ना हम’ हे गाणेही रसिकांच्या अद्याप ओठावर आहे. ‘एका अभिनेत्रीच्या मोहात पडलेला दिग्दर्शक’ असे या चित्रपटाचे सूत्र होते. या चित्रपटातून जणू काही त्यांनी आपल्या आयुष्याचीच कहाणी सांगितली. ‘वक्त ने किया’ गाण्यात भव्य स्टुडिओ, स्टुडिओचा मोठा दरवाजा, दिग्दर्शकाची खुर्ची आणि बाहेरून येणारा प्रकाशाचा झोत हे सर्व काही उत्कृष्टपणे जमवून आणण्यात आले आहे. गाण्यात गुरु दत्त आणि वहिदा रहेमान दिसतात. पाठीमागे गीता दत्त यांच्या दु:खी स्वरातील गाणे सुरू असते. गीतकार कैफी आझमी आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या संगीताची जादू आजही कायम आहे.
अन्य लोकप्रिय गाणी
‘कागज के फूल’ चित्रपटातील ‘देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी’ या गाण्यात गुरुदत्त वयोवृद्ध दाखविला असून गाण्यातील वेदना आणि दु:ख प्रेक्षकांनाही आपले वाटते. ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस ५५’ चित्रपटात ‘मेरी दुनिया लूट रही थी और मैं खामोश था’ या गाण्यात गुरु दत्त दिसतो. हे गाणे कव्वाली ढंगाचे आहे. याच चित्रपटातील ‘दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई’ हे गाणे गुरु दत्त आणि जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित झाले आहे. याच चित्रपटातील ‘चल दिए बंदा नवाझ’ हे गाणेही वेगळ्या प्रकारचे आहे. ‘प्यासा’मध्ये ‘हम आप की आंखों में इस दिल को फंसा दे तो’ असे गुरु दत्त म्हणतो तेव्हा ते पाहणाऱ्यालाही आपण स्वत: तेथे आहोत, असे वाटत असते. याच चित्रपटातील ‘जाने वो कैसे लोग ये जीन को प्यार को प्यार मिला, हमने तो जब कलिया माँगी थी काटों का हार मिला’ हे गाणे जणू काही गुरुदत्तच्या आयुष्याचा आलेखच मांडून जाते.हेमंतकुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातील हे गाणे आजही स्मरणात आहे. ‘आरपार’ चित्रपटातील ‘मोहब्बत जी कर लो, भर लो, अजी किसने टोका है’ किंवा ‘सुन सुन जालिमा’ ही मोहंमद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजातील गाणी आणि ओ. पी. नय्यर यांचे संगीत यांचा योग जुळून आलेली. ‘चौदहवी का चाँद’मधील रफीच्या आवाजातील ‘चौदहवी का चाँद हो, या आफताब हो, जो भी  हो तुम खुदा की कसम लाजवाब हो’ हे गाणेही झकास. ‘मिली खाक में जो मोहब्बत जला दिल का आशियाना’ (चौदहवी का चाँद), ये दुनिया अगर मिल भी जाए (प्यासा) ही गाणीही खास गुरुदत्त ‘टच’ असलेली. ‘साहिब बीबी और गुलाम’ या त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील ‘भंवरा बडा नादान है’, ‘चले आओ’, ‘मेरी बात रही है मेरे मन में’, ‘ना जाओ सय्या चुरा के बय्या’.. अशी कितीतरी!
अवघ्या ३९व्या वर्षी आयुष्याची अखेर
वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’ आणि ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ असे तीन दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. शांत आणि धीर गंभीर चेहरा, मोठे कपाळ, काळेभोर डोळे आणि चेहऱ्यावर वेदना असलेले गुरुदत्त खरोखरच ‘शापित गंधर्व’ ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru dutt a cursed demigod
First published on: 12-10-2014 at 06:29 IST