‘रॉक ऑन २’ या चित्रपटानंतर बी टाऊनमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी जोर धरला. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि इतकंच नव्हे तर फरहानच्या घरी श्रद्धा लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यांच्या या रिलेशनशीपला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांची सुरुवातीपासूनच संमती नव्हती. फरहानच्या घरातून ते श्रद्धाला घेऊन गेले होते. या सर्व घटनांनंतर तिनेही फरहानपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. शक्ती कपूर आता फरहान- श्रद्धाच्या नात्याविरोधात नाहीत असे वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धाने इन्स्टाग्रामवर फरहानला अनफॉलो केलं होतं. पण आता पुन्हा ती त्याला फॉलो करू लागली आहे. त्याच्या वाढदिवशी श्रद्धाने ट्विटरवरही शुभेच्छा दिल्या आहेत. शक्ती कपूर यांच्या सांगण्यावरून ती बऱ्याच दिवसांपासून फरहानपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. पण आता हा दुरावा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : छे छे…’पद्मावत’मध्ये ३०० कट्स नाहीच- प्रसून जोशी 

‘रॉक ऑन २’ चित्रपटादरम्यान जेव्हा फरहान आणि श्रद्धा यांच्यातील मैत्री वाढत होती, तेव्हाच तिच्या वडिलांनी आक्षेप घेतला होता. फरहानने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पत्नी अधुनाला घटस्फोट दिला. श्रद्धा आता पुन्हा एकदा त्याच्याशी मैत्री करण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे.