लस “ज्यांना गरज आहे” त्यांच्यासाठी असून “ज्यांना हवी आहे” त्यांच्यासाठी नाही अशा आशयाच्या भारत सरकारच्या निर्णयावर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी भाष्य केलं आहे. स्कॅम १९९२चे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट करत आपली शंका बोलून दाखवली आहे.

त्यांनी आपला २५ वर्षांचा मुलगा पल्लव याचा फोटो शेअर केला आहे. पल्लव डाऊन्स सिंड्रोमने ग्रस्त आहे. ते लिहितात, “माझा मुलगा पल्लव डाऊन्स सिंड्रोमने ग्रस्त आहे. काही वर्षांपूर्वी त्याला श्वसनसंस्थेची समस्याही निर्माण झाली होती. मग त्याला लस हवी आहे की त्याला लसीची गरज आहे?”

हंसल यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी पल्लवसाठी प्रार्थना केली आहे, काहींनी त्याला शुभाशिर्वाद दिले आहे. काही जणांनी हंसल यांना डॉक्टरांशी बोलून लसीकऱणाबद्दल सल्ला घेण्याचे सुचवलं आहे. तर काही युजर्सनी लसीकरण ही सर्वांचीच गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

काही वेळापूर्वी चित्रपट प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भातल्या बातमीमुळे हंसल चर्चेत आले होते. यानुसार, जर एखादी समस्या निर्माण झाली तर हंसल यांच्यासह अन्य काही दिग्दर्शक, निर्मात्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत हंसल यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा निर्णय आत्ता घेण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हंसल यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आणि अल्पावधीतच ती प्रचंड गाजली. यात अभिनेता प्रतिक गांधी प्रमुख भूमिकेत होता. १९९२च्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित ही वेबसीरीज होती.