उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य यांच्या जोरावर अभिनेता बॉबी देओलने ९० चा काळ चांगलाच गाजवला. गालावर पडणारी खळी आणि कुरळे केस यांच्यामुळे त्याकाळी तरुणींमध्ये बॉबीची तुफान क्रेझ होती. त्याच बॉबी देओलचा आज वाढदिवस. त्यामुळे त्याच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

१९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या बॉबीचं खरं नाव विजय सिंग देओल. ‘बरसात’ या चित्रपटामध्ये तो एका रोमॅण्टिक हिरोच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर हळूहळू तो अॅक्शन हिरो म्हणून नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला. बॉबी देओलचे ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘करिब’, ‘अजनबी’, ‘हमराज’ आणि ‘यमला पगला दिवाना’ हे चित्रपट विशेष गाजले.

अभिनयाप्रमाणेच बॉबी देओलची नृत्यशैलीदेखील त्याकाळी तुफान लोकप्रिय ठरली. इतकंच नाही. तर, ९०च्या दशकामध्ये डोंगर कडांवर चढून प्रेमाची आरोळी ठोकणारा आणि अभिनेत्रीचं मन जिंकणाऱ्या बॉबीने प्रेम व्यक्त करण्याची ही नवीन फिल्मी स्टाइल सर्वांसमोर आणली.

बॉबी देओलचे विविध चित्रपट आणि त्यातही त्याच्या गाजलेल्या भूमिका पाहिल्या तर ‘सोल्जर’ ते ‘डीजे वाले बॉबी’पर्यंतचा त्याचा हा प्रवास अत्यंत रंजक होता हे सारेच मान्य करतील.