मैत्री आणि मैत्रीतून खुलणारं प्रेम हे बॉलिवूड चित्रपटांचे जवळचे विषय आहेत. अशाच चित्रपटातील काही दृश्यांमध्ये आणि भूमिकांमध्ये अनेकजण एकदातरी स्वत:चा शोध घेतात. त्यामुळे हे चित्रपट एका अर्थी आपल्याला बरच काही शिकवून जातात असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग नजर टाकूया अशाच काही ‘ऑल टाईम फेव्हरेट’ चित्रपटांतील शिकवण देणाऱ्या या दृश्यांवर…
प्राधान्य कोणाला द्यायचं हे ठरवा….
‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट तर सर्वांच्याच लक्षात असेल ना. जेव्हा ‘जय’च्या (इरफान खान) लक्षात येते की अदितीचा (जेनेलिया) वाढदिवस आहे आणि यादिवशी अदितीलाही आपण तिच्यासोबत असले पाहिजे असे वाटत असेल. हे माहित असतानाही ‘जय’ त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर जाण्याचे का ठरवतो? आपल्या सर्वात जवळचा मित्र/मैत्रिणीचा वाढदिवस ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्यांना वाढदिवसादिवशी निदान शुभेच्छा तरी द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मित्रांना प्राधान्य देणं फार महत्त्वाचं आहे.
कोणत्याही परिस्थितीत पुढे चालत राहण्यासाठी प्रेरणा देणारी मैत्री…
मैत्रीमध्ये असा एक टप्पा येतो जेव्हा काही गोष्टी आपल्या खास मित्रमंडळींपासूनही लपवल्या जातात. पण, त्या गोष्टी अनपेक्षितपणे त्याच मित्रांना कळाल्यावर भावनांची गुंतागुंत, त्याच्या आडून डोकावणारं आपलं महत्त्वाकांक्षी मन आणि आपल्या आयुष्याची पुढची वाट आपल्याला खुणावत असते. याच परिस्थितीवर भाष्य करणारं ‘ये जवानी है दिवानी’मधील हे दृश्य बरंच काही शिकवून गेलं. कोणत्याही परिस्थिती आपल्या इच्छा- आकांक्षांचा बळी न देता वाट चालत राहण्यासाठी काही मित्र- मैत्रीणीच आपल्या पाठीशी असतात. त्यांच्या नुसत्या बोलण्यानेच आपल्या मनाचा भार हलका होतो.
स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं… अगदी मित्रांनासुद्धा..
तुम्ही मित्र आहात म्हणून प्रत्येकवेळेस एकमेकांसोबत राहिलचं पाहिजे अस नाही. मित्रांना त्यांच्याप्रमाणे जगू द्यावं. याचाच अर्थ तुम्ही एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करता. त्यांनाही स्वतःच असं वेगळ जग आहे याचा तुम्ही विचार करून त्यांच्या मनाप्रमाणे ते जगायला देणे गरजेचे आहे. पण, हो मैत्रीमध्ये मिळणाऱ्या या स्वातंत्र्याची जास्त सवय लागली की बऱ्याचदा मैत्रीच्या नात्याला तडा जातो. ‘३ इडियट्स’मधील हे राजू रस्तोगी म्हणजेच शर्मन जोशी ‘चतुर रामलिंगम’च्या रुममध्ये शिफ्ट होतो त्यावेळचं दृश्य आठवतंय का?
Happy friendship day 2017 : मैत्रीचे धागे घट्ट बांधणारी ही गाणी तुम्ही नक्की ऐका!
माफी मागण्यात गैर काय…
बऱ्याचदा माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन मैत्रीच्या नात्यात चढउतार येतात. याचीच प्रतिची येते ‘दिल चाहता है’मधील या दृश्यातून. सिद्धार्थच्या प्रेमाबाबत बोलताना आकाश मर्यादा ओलांडतो. पण जेव्हा त्याला आपली चुकी कळते तेव्हा तो माफी मागून स्वतःची चूक सुधारतो आणि सिद्धार्थसुद्धा त्याला माफ करतो. मैत्रीसुद्धा अशीच आहे. मनात काहीही न ठेवता चुक झाल्यावर एकाने माफी मागावी तर दुसऱ्याने तितक्याच मोठ्या मनाने माफ करायचे. कधीही मनात राग किंवा द्वेष न ठेवता मैत्रीच्या या निखळ नात्याचा आनंद घेण्याचा संदेशच जणू या दृश्यातून आपल्याला दिला.
चांगले मित्र केव्हाही आणि कुठेही भेटू शकतात…
मित्र भेटण्याची अमुक अशी एकच वेळ नसते. चांगले मित्र केव्हाही आणि कुठेही भेटू शकतात. याचं उदाहरण पाहायला मिळालं ‘क्वीन’ या चित्रपटातून. आयुष्य अगदीच काही वाईट नाही हे जेव्हा राणीला (कंगना) समजवण्याची गरज असते त्यावेळेस तिच्या आयुष्यात ‘विजयालक्ष्मी’ (लिसा) येते. ती राणीला जीवनाचा आनंद लुटायला शिकवते. तसंच, राणीने स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करू नये असंही ती समजावते. या चित्रपटातून या दोन्ही अभिनेत्रींच्या मैत्रीची वेगळीच बाजू पाहायला मिळाली होती.