‘अलिगढ’ चित्रपट यंदाच्या ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला तेव्हा चित्रपट संपल्यानंतर सगळयांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुकाची दाद दिली. हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून हंसल मेहतांचे कसब असला तरी संपूर्ण चित्रपट आणि तो विषय एकाच व्यक्तीने पेलला आहे तो म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयीने.. ‘सत्या’, ‘शूल’, ‘घात’ चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयी वेगळा होता. आणि आता काहीएक वर्षांनंतर ‘राजनीती’, ‘स्पेशल २६’ सारख्या निवडक चित्रपटांमधून समोर आलेल्या मनोज वाजपेयीचे रूप पूर्णपणे वेगळे आहे. ‘हिरो’ म्हणून इंडस्ट्रीतील प्रमाणित गुणांपैकी एकही गुण नसताना केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले स्थान निर्माण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, मेहनत असली तरी त्याला नशिबाची साथही आवश्यक असते, असे आग्रही मत मनोज मांडतो.
‘अलिगढ’ हा चित्रपट अलिगढ मुस्लीम विद्यापीठात काम करणाऱ्या समलिंगी प्राध्यापकाच्या वास्तव कथेवर बेतलेला आहे. समलिंगी असल्याने नोकरी गमावण्याची पाळी आलेल्या या प्राध्यापकाची भूमिका रंगवणे आव्हान होते. त्याचे कारण म्हणजे समलिंगी व्यक्तींच्या अडचणी, त्यांची मानसिकता ही आपल्याला सहजी कळणे अवघड असते, असे मनोजने सांगितले. अर्थात, दिग्दर्शक म्हणून हंसल मेहतांनी कथेवर एवढे तपशीलवार काम केले असल्याने ते समजून घेऊन प्रामाणिकपणे ती भूमिका साकारणे आपल्या हातात होते, असे त्याने सांगितले. प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीला जेव्हा प्रेक्षकांकडून दाद मिळते तेव्हा कुठल्याही अभिनेत्याला आनंदच होतो. तसाच आनंद मलाही ‘अलिगढ’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून जो प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे झाला असल्याचे तो म्हणतो.
सध्या ‘अलिगढ’ चित्रपटाबरोबरच निर्माता आणि कलाकार अशा दोन्ही भूमिकांमध्ये तो व्यस्त आहे.
‘मिसिंग’ या चित्रपटासाठी तो दिग्दर्शक नीरज पांडेबरोबर तो सहनिर्माता म्हणून काम पाहतो आहे. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली होती. नीरजला या चित्रपटासाठी आर्थिक मदत हवी होती. मुळात, मी चित्रपटात काम करत असल्याने त्याची प्रत्येक बाजू मला माहिती होती. त्यामुळे निर्माता म्हणून मीच जबाबदारी उचलायचे ठरवले. पण याचा अर्थ मी निर्माता म्हणून यापुढेही काम करेन असे नाही, मनोज स्पष्टपणे सांगतो. नीरज पांडे, हंसल मेहतांसारख्या दिग्दर्शकांबरोबर कारकिर्दीच्या या टप्प्यावर काम करायला मिळते आहे हे आपले भाग्य असल्याचे त्याने सांगितले. हंसल एक अतिशय संवेदनशील दिग्दर्शक आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर त्याचे असे मत आहे. ते त्याच्या विचारमंथनातून निर्माण झालेले असते आणि चित्रपटाच्या माध्यमातून हळुवारपणे आपल्या विचारांची मांडणी करणे हे दिग्दर्शक म्हणून त्याचे कसब असल्याने त्याच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचे मनोजने सांगितले.
बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून आपली कारकीर्द घडवणे आणि ती टिकवणे या दोन्ही गोष्टी फार अवघड असतात, असे तो म्हणतो. मात्र, कितीही कठीण परिस्थिती असली तरी चांगल्याच चित्रपटात काम करायचे, आपल्याला चित्रपटाची कथा पटली तरच तो चित्रपट करायचा या विचारानेच आजवरची वाटचाल केली असल्याने अभिनेता म्हणून आज एक आदर, सन्मान आपल्याला मिळतो आहे, असे त्याला वाटते.
कारकिर्दीच्या मुश्कील टप्प्यावर या विचाराने चालणे सोपे नव्हते. मात्र, आज त्याच माझ्या आग्रही विचारांमुळे चांगली कथा असलेले दिग्दर्शकच माझ्याकडे येतात. भलतेसलते निर्माते-दिग्दर्शक आपल्याकडे फिरकतही नाहीत, असे तो म्हणतो. आत्ताही एकापाठोपाठ एक अशा पाच चित्रपटांमधून तो काम करतो आहे. ‘अलिगढ’ चित्रपट प्रदर्शित होईल. ‘मिसिंग’चे चित्रीकरण सुरू आहे. त्यानंतर ‘दुरान्तो’, ‘सात उचक्के’ आणि ‘ट्रॅफिक’ या तीन चित्रपटांवरही काम सुरू आहे. या पाचही चित्रपटांचे विषय वेगवेगळे असल्याची माहिती मनोजने दिली. मेहनतीने काम केले तर तुम्हाला यश मिळतेच. पण मेहनतीला नशिबाचीही साथ मिळायलाच हवी तर गोष्टी जमून येतात, असे आपल्याला स्वानुभवातून वाटत असल्याचे मनोज वाजपेयीने सांगितले.