चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचबद्दल अनेकदा बोललं जातं. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल भाष्यही केलं. काहींनी तक्रारही दाखल केली. काम मिळवण्यासाठी अभिनेत्रींना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याची अनेक उदाहरणंही इंडस्ट्रीत आहेत. आता पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचा मुद्दा समोर येण्याचं कारण म्हणजे एका अभिनेत्रीने यासंदर्भात केलेलं ट्विट. ‘हेट स्टोरी’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री भैरवी गोस्वामीचं ट्विट सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

भैरवीने ट्विट केले की, ‘काम मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात (ही गोष्ट नाकारता येत नाही), आणि दहा वर्षांनंतर म्हणतात की त्यांचं लैंगिक शोषण झालं होतं.’ अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्यानंतर भैरवीने रिप्लायमध्ये हेसुद्धा स्पष्ट केलं की चित्रपटसृष्टीप्रमाणेच अन्य क्षेत्रातही असे प्रकार होतात. लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर लगेचच आवाज का उचलला जात नाही असाही प्रश्न ट्विटरकरांनी केला.

वाचा : तैमुरचे व्हायरल फोटो काढण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भैरवी यापूर्वीही तिच्या एका ट्विटसाठी चर्चेत राहिली होती. अभिनेत्री क्रिती सनॉनवर तिने ट्विटरवरून निशाणा साधला होता. अर्वाच्च शब्दांत भैरवीनं क्रितीवर टीका केली होती. बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या भैरवीने केलेल्या टीकेनंतर नेटिझन्सनी क्रितीची बाजू घेत तिच्याविरोधात अनेक कमेंट्स केले होते. त्याचप्रमाणे प्रसिद्धीसाठी भैरवीने अशा प्रकारची टिप्पणी केल्याचीही चर्चा होती. ‘भेजा फ्राय’, ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात भैरवीने भूमिका साकारली आहे.