‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही छोट्या पडद्यावरील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेम ऑफ थ्रोन्सचे आगामी पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर’ या कादंबरीवर आधारित असलेली मालिका आहे. याचे पहिले पर्व २०११ साली प्रदर्शित झाले होते. या पर्वाला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून दर वर्षी एक पर्व या क्रमाने ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सलग आठ पर्व प्रदर्शित झाले. मालिकेचे आठवे पर्व शेवटचे होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबत काहीसी नाराजी होती. त्यामुळे चाहत्यांच्या आग्रहाखातर निर्मात्यांनी ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आगामी पर्वाचे नाव हाऊस ऑफ ड्रायगन असे ठेवण्यात आले आहे. परंतु हा मालिकेचा प्रिक्वेल असेल. यात जॉन स्नो, आर्या स्टार्क, मदर ऑफ ड्रायगन, सँसा स्टार्य अशा कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिरेखा दिसणार नाहीत. या व्यक्तिरेखा निर्माण होण्याआधी वेस्टरॉस साम्राज्यात अशा कुठल्या घडामोडी घडल्या होत्या त्यामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे युद्ध झाले. याबाबत या पर्वात माहिती दिली जाणार आहे. अर्थात हा प्रिक्वेल जरी असला तरी प्रेक्षक याबाबत प्रचंड उत्सुक आहेत. निर्मात्यांनी केलेल्या ट्विटवर काही तासात तब्बल ४० हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. यावरुनच आपल्याला ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.