दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध मीडिया कंटेंट कंपनी शेमारू एन्टरटेन्मेन्टवर एकेकाळ गाजलेल्या किंबहुना आजही प्रेक्षकांची पसंती मिळविणाऱ्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटाच्या प्रसारणावर स्थगिती आणली आहे. १९६६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता राज कपूर आणि अभिनेत्री वहीदा रेहमान महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शेमारु कंपनीच्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटाच्या वितरणावर, प्रसारणावर आणि विक्रीवर स्थगिती आणण्यात आली आहे.
न्यायाधीश राजीव सहाय एन्डलॉ यांनी चित्रपटाचे निर्माते शंकरदास केसरीलाल शैलेंद्र यांच्या मुलांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान शेमारु कंपनी आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना उद्देशून हा निर्णय दिला. प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र हे ‘तीसरी कसम’ या चित्रपटाचे निर्माते होते. प्रसिद्ध हिंदी लेखक फणीश्वर नाथ रेणू यांच्या कथेवर आधारित कथानक या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर साकारण्यात आले होते.
न्यायालयाने सुनावणीदरम्यान असे सांगितले आहे की, शेमारु कंपनी आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही माध्यमाद्वारे हा चित्रपट किंवा त्यातील कोणत्याही भागाचे पुनरुत्पादन, वितरण, विक्री किंवा जाहिरातीकरण करणार नाहीत. न्यायालयाने शैलेंद्र यांच्या मुलाला आणि मुलीला सोबतच त्यांच्या इतर वारसांनाही यासंदर्भातील नोटीस पाठविली आहे. शैलेंद्र यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाची एक षष्ठांश भागीदारी शेमारु कंपनीला विकली होती. या प्रकरणीची पुढील सुनावणी नऊ जानेवारीला होणार आहे.
शेमारु कंपनीने ‘तिसरी कसम’ या चित्रपटाच्या प्रसारण, विक्री आणि वितरण थांबवावे अशी मागणी शैलेंद्र यांच्या मुलीने म्हणजेच अम्ला शैलेंद्र मजूमदार यांनी एका याचिकेद्वारे केली होती, तसेच शैलेंद्र यांच्या मुलांनी एक कोटी एक हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या चित्रपटाच्या विक्री, वितरण आणि प्रसारणासंदर्भात स्थगितीचे आदेश दिले.
वाचा: ‘सध्याच्या घडीला आमिरच बॉलिवूडमधील राज कपूर’
शैलेंद्र हे हिंदी चित्रपसृष्टीतील एक नावाजलेले गीतकार होते. त्यांनी विविध चित्रपटगीतांना शब्दबद्ध करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘आवारा हू’, ‘मेरा जूता है जापानी’ या आणि अशा अनेक गीतांद्वारे शैलेंद्र यांनी चित्रपट गीतांवर त्यांच्या शब्दांचा साज चढवला होता. ‘तीसरी कसम’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शैलेंद्र यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी झाला खरा. पण, कालांतराने काही क्लासिक बॉलिवूड चित्रपटांच्या यादीमध्ये ‘तीसरी कसम’ या चित्रपटाच्या नावाचाही समावेश करण्यात आला.