८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. याचा पुरावा देखील मिळाला आहे. ‘रामायण’ या मालिकेने टीआरपीचे नवे विक्रम रचले. आता सोशल मीडियावर मालिकेतील पात्र चर्चेत आहे. राम, लक्ष्मण, सीता, रावण, कुंभकर्णानंतर आता रावणाचा मुलगा मेघनाथ देखील सध्या सतत चर्चेत आहे.
रामायण मालिकेत मेघनाथ ही भूमिका अभिनेते विजय अरोरा यांनी साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर होती. विजय यांना रामायण मालिकेनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी विजय यांची तुलना अभिनेता राजेश खन्ना यांच्याशी केली जात असे. खुद्द राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची जागा कोणी घेऊ शकतं तर तो म्हणजे अभिनेता विजय अरोरा असे म्हटले होते.
विजय यांनी १९७२ साली अभिनेत्री रीना रॉयसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘यादों की बारात’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री जीनत अमानसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि त्यांनी त्या स्विकारल्याही. पण काही दिवसांनंतर त्यांना चित्रपटात काम मिळू नये यासाठी कट रचला गेल्याचे म्हटले जाते.
त्यानंतर रामानंद सागर यांनी रामायणात भूमिका साकारण्याची संधी विजय यांना दिली. त्यांनी रावणाचा मुलगा मेघनाथ ही भूमिका त्यांना दिली. त्यांची ही भूमिका त्यावेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. त्यानंतर त्यांना पुन्हा चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. पण आता टीव्हीवर पुन्हा रामायण ही मालिका पाहण्यासाठी विजय आपल्यामध्ये नाहीत. २००७ साली त्यांचा कर्क रोगाने मृत्यू झाला.