अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय शक्यतो वादग्रस्त विधान करण्यास टाळतात. पण जया बच्चन मात्र प्रसारमाध्यमांसमोर बेधडकपणे वावरताना दिसतात. काही वर्षांपूर्वी असं काही झालं की जया बच्चन शाहरुख खानच्या कानाखाली मारणार होत्या. एका मुलाखतीत, खुद्द त्यांनीच याचा खुलासा केला होता.

बच्चन घराण्याची सून ऐश्वर्याने शाहरुखसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण ऐश्वर्या आणि शाहरुखच्या मैत्रीत मीठाचा खडा का पडला याचं कारण खूप कमी जणांना माहित असेल. दोघांमधील वादाची सुरुवात २००३ मध्ये ‘चलते-चलते’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. आता ‘चलते-चलते’ या चित्रपटाचा ऐश्वर्याशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर राणी मुखर्जीच्या आधी ऐश्वर्याची निवड या चित्रपटासाठी झालेली आणि त्याचं थोड शूटिंगही झालं होत. यादरम्यान ऐश्वर्या आणि सलमान खानमध्ये खटके उडत होते. अनेकदा दोघांची भांडणं होत असे. इतकंच नव्हे तर सलमानने ‘चलते-चलते’च्या सेटवर जाऊनही काही वेळा ऐश्वर्याशी भांडण केल्याचं म्हटलं जातं. यामुळे अनेकदा शूटिंग मध्येच बंद करावं लागत होतं. यामुळे शाहरुखला नुकसान सोसाव लागत होतं, कारण तो या चित्रपटाचा निर्मातादेखील होता. या घटनेनंतर शाहरुखनं रागाच्या भरात ऐश्वर्यावर वाईट शब्दांत कमेंट केल्या होत्या. जेव्हा ही गोष्ट जया बच्चन यांना समजली तेव्हा त्यांनी मला शाहरुखच्या कानाखाली मारावसं वाटतं असं म्हटलं होतं.

जया बच्चन या वादानंतर दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या, ”होय, मी खरोखरंच त्याच्या कानाखाली मारेन. खरं तर अजून पर्यंत त्याची माझी भेट झाली नाही पण जेव्हाही मी त्याला भेटेन तेव्हा त्याला या वादाबद्दल विचारणार आहे. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे समजून कानाखाली मारेन. माझं आणि शाहरुखचं नातं अगदी आई-मुलासारखं आहे.”

शाहरुखने नंतर बच्चन कुटुंबीयांसोबत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. बच्चन कुटुंबीयांच्या ‘जलसा’ या निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुखने आवर्जून हजेरी लावली. इतकंच नव्हे तर या पार्टीत झालेल्या दुर्घटनेतून ऐश्वर्याच्या मॅनेजरचे प्राणही त्याने वाचवले.