अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. काही लोक शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत असं ती म्हणाली. तिच्या या कॉमेंटवर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने संताप व्यक्त केला. तू भाजपाची प्रवक्ता झाली आहेस का? असा सवाल तिने कंगनाला केला आहे.

“लाज वाटायला हवी, काही लोक शेतकऱ्यांचं नाव वापरुन राजकारण करत आहेत. मला खात्री आहे सरकार अशा विरोधकांना फायदा उचलू देणार नाही. अन्यथा ही मंडळी शाहीन बागसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण करतील.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. तिच्या या ट्विटवर हिमांशीने संताप व्यक्त केला आहे.

“ओह, आता ही भाजपाची प्रवक्ता देखील झाली का? कुठल्याही मुद्द्याला कसं फिरवायचं हिला आता चांगलंच जमतंय. बघा ना दंगल होण्याची शक्यता ती आधिच वर्तवतेय. मुख्यमंत्र्यांनी आधीच काहीतरी केलं असतं तर भर थंडीत घराबाहेर पडण्याची अशी वेळ आली नसती.” अशा आशयाचं ट्विट करुन हिमांशीने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शेतकरी बुराडी मैदानावर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावही त्यांनी नाकारला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या तीसहून अधिक शेतकरी गटांची बैठक रविवारी झाली. बुराडी मैदान हा ‘खुला तुरुंग’ असल्यामुळे आपण तेथे जाणार नाही, असे आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर सांगितले. शेतकरी कुठल्याही अटींवर चर्चेला तयार नसल्याचेही ते म्हणाले.