चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी कोणत्याही नवोदित अभिनेत्रीला काही सल्ले दिले जातात, काही बाबतीत तिला सावधही करण्यात येते. या साऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो लैंगिक शोषणाचा. काही निर्माते, दिग्दर्शक नवोदित अभिनेत्रींना तडजोड करण्याचा सल्ला देत करिअर आणि चित्रपटांचे आमिष दाखवतात. अशा काही व्यक्तींच्या जाळ्यात येऊन बऱ्याच अभिनेत्री लैंगिक शोषणाचा शिकार झाल्याचे पाहायला मिळाते. काही अभिनेत्रींनी याविषयी माध्यमांसमोर खुलासा केला, तर काही अभिनेत्रींनी सुरुवातीपासूनच अशा प्रकारची तडजोड करण्यास नकार दिला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रियांका चोप्रा. गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनने लैंगिक शोषण केल्याचा खुलासा अनेक अभिनेत्रींनी केला आणि कलाविश्वात एकच खळबळ माजली. त्याचेच पडसाद बॉलिवूडमध्येही उमटल्याचे पाहायला मिळाले.

बॉलिवूडमध्ये विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांमध्ये कलाकार मंडळींना विशेषत: अभिनेत्रींना त्यांनी कधी अशा प्रसंगाना तोंड दिले आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आणि मग याविषयी कधीही न उलगडलेल्या गोष्टी सर्वांसमोर आल्या. ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रालाही अशा प्रसंगांचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा तिच्या आईने म्हणजेच मधु चोप्रा यांनी एका प्रसिद्ध दैनिकाशी बोलताना केला. प्रियांका कधी अशा प्रसंगाला सामोरी गेली आहे का, असा प्रश्न विचारला असता तिची आई म्हणाली, “अवघ्या १७ वर्षांची असताना तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे प्रत्येक क्षणी मी तिच्यासोबतच असायचे. अगदी मागच्या तीन वर्षांपासून मी तिच्यासोबत जाणे कमी केले आहे. एकदा मी तिच्यासोबत असताना एका महाशयांनी, ‘तुझ्या आईला काही वेळासाठी बाहेर जाण्यास सांगशील, जेणेकरुन मी तुला चित्रपटाची कथा ऐकवू शकतो’, अशी विचारणा केली. त्यावर प्रियांका स्पष्ट नकार देत म्हणाली, ‘जर ती कथा माझी आई ऐकू शकत नसेल, तर मला अशा कथेवर काम करण्यात काहीच रस नाही’, ती आपल्या भूमिकेवर ठाम होती.”

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

प्रियांका केवळ या एकाच प्रसंगाला सामोरी गेली असे नसून, एका डिझायनरनेदेखील तिच्यासमोर अशीच परिस्थिती निर्माण केली होती. याविषयी सांगताना तिची आई म्हणाली, “डिझायनरने दिग्दर्शकांच्या सांगण्यावरुन प्रियांकाला अती शरीरप्रदर्शन होईल असे कपडे घालण्यास सांगितले होते. ‘मिस वर्ल्ड’चे ‘खरे सौंदर्य’ दिसलेच नाही तर त्याचा काय उपयोग, असे त्या दिग्दर्शकांचे म्हणणे होते. त्यावेळी प्रियांकाने त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. आपला चित्रपट नाकारल्यामुळे त्या दिग्दर्शकाचा स्वाभिमान दुखावला होता. तो एक चित्रपट नाकारल्यामुळे प्रियांका पुढच्या १० चित्रपटांना मुकली होती.”

आपण नाकारलेल्या त्या चित्रपटांबद्दल तिच्या मनात कधीही खंत पाहायला मिळाली नाही, असेही मधु चोप्रा यांनी स्पष्ट केले. कोणत्याही एका निर्णयामुळे तुमचे आयुष्यच संपुष्टात येत नाही. कारण, शेवटी तुमचे आयुष्य सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, हा महत्त्वाचा संदेशही त्यांनी दिला. त्यासोबतच प्रियांकाने आतापर्यंत हॉलिवू़डमध्ये अशा कोणत्याच प्रसंगाचा सामना केला नसल्याचेही त्यांनी सांगितले. हॉलिवूडमध्ये प्रियांकाचा अनेकांना अभिमान असून, तिचा आदरही केला जातो, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे कधीही स्वत:ची तत्वं सोडून वागू नका, हा मुद्दा मधु चोप्रा यांनी अधोरेखित केला.