मराठी चित्रपटाने मुंबई, महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता थेट परदेशात झेप घेतलीय. बॉलिवुडप्रमाणे हॉलिवूडलाही सध्या मराठी चित्रपटांची भूरळ पडली आहे. हॉलीवूडची ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही नामांकित कंपनी ‘परतु’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे.

दोन देशातल्या कलाकार तंत्रज्ञांचा संगम असणाऱ्या ‘परतु’ या चित्रपटाच्या पूर्णत्वाची घोषणा नुकतीच न्यूयॉर्क येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये भारतीय दूतावासाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी ‘परतु’ चित्रपटाद्वारे हॉलीवूडच्या ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीच्या माध्यमातून हॉलीवूड व बॉलीवूडचं एक नवं पर्व तयार झाल्याचं यावेळी सांगितलं. चित्रपटाच्या प्रसिद्धी करिता याचा उपयोग होईलचं पण ‘परतु’ सारख्या प्रादेशिक चित्रपटांसाठी एक नवं व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही अमेरिकेतील नामांकित मल्टीमिडिया कंपनी असून निर्मिती, वितरण, वेब मिडिया, टेलीव्हिजन अशा विविध माध्यमांतून या कंपनीचा जगभरात नावलौकिक आहे.
गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी ‘परतु’  चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली आहे. तर याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ‘परतु’ चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतु’ ला पार्श्वसंगीत दिले आहे. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे यांच्या ‘परतु’  चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood company will produce marathi film partu
First published on: 07-08-2015 at 12:42 IST