मराठीत वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. मात्र, भयपटाचे कथानक मराठी चित्रपटसृष्टीत फारसे हाताळले जात नाही. अर्थात काहींनी भयपट रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यातच आता आणखी एका भयपटाचे नाव समाविष्ट झाले आहे. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘कनिका’ हा भयपट चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी ‘कनिका’ हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. एक सूडकथा असलेले कथानक या चित्रपटातून साकारण्यात आले आहे. त्यामुळे ‘कनिका’ आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे. पुष्कर मनोहर यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाहीये. त्यामुळे कथानकाच्या जोरावरच चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता खिळवून ठेवतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमेय नारे यांच संगीत, कॅमेरामन चंद्रशेखर नगरकर तर कुलदीप मोहन यांनी संकलन केलं आहे.

unnamed

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मराठीत सामाजिक किंवा विनोदी प्रकारचेच चित्रपट होतात असं एक चित्र आहे. मात्र, त्या पलिकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या खूप संवेदनशील असतात. त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. मराठीमध्ये थरारक सूडकथेचा हा वेगळा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे,’ असं दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी सांगितलं. दरम्यान, सध्या ‘कनिका’ या चित्रपटाचा पोस्टर अनेकांचेच लक्ष वेधत आहे. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथानकाबाबतची उत्सुकता बळावली आहे. ‘कनिका’चा हा पोस्टर पाहिल्यास प्रथमदर्शनी ‘अॅनाबेल’ या चित्रपटाच्या पोस्टरच्या हलकासा जवळ जाणारा वाटत आहे. त्यामुळे या बहुचर्चित ‘कनिका’चा थरार लवकरच पाहायला मिळणार आहे.