‘हाऊसफुल्ल’ २०१० साली पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा ते दिग्दर्शक साजिद खानचं बाळ होतं. साजिदनेच त्याचा दुसरा भागही तिकीटबारीवर यशस्वी करून दाखवला. मात्र ‘हिम्मतवाला’ आणि त्यानंतर आलेल्या ‘हमशकल्स’ या चित्रपटांनी साजिदची तथाकथित गुणवत्ता तिकीटबारीवर इतक्या वाईट पद्धतीने स्पष्ट केली की ‘हाऊसफुल्ल ३’ची धुरा त्याचे लेखक कम दिग्दर्शक बनलेल्या साजिद-फरहाद या जोडीकडे देण्यात आली. त्या साजिदचा बिनडोक गोंधळ बरा होता असं म्हणावं इतक्या सुमार विनोदबुद्धीने या साजिद-फरहाद जोडीने ‘हाऊसफुल्ल ३’ पडद्यावर आणला आहे.
गैरसमजातून निर्माण होणारा विनोद ही आधीच्या दोन्ही ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटांची मूळ कल्पना होती. भरमसाटी व्यक्तिरेखा आणि त्यांच्या एकमेकांमध्ये अडकून पडल्यामुळे होणारा विनोद याची हाताळणी साजिद खानने बऱ्यापैकी केली होती. त्यामुळे ‘हाऊसफु ल्ल २’मध्ये डझनभर कलाकार असूनही चित्रपटाने तिकीटबारीवर कमाल कमाई केली होती. ‘हाऊसफुल्ल ३’मध्ये अर्धा डझनच कलाकार आहेत तरीही साजिद-फरहाद या जोडीला ते पेलवले नाहीत. आधीच्या ‘हाऊसफुल्ल’ मालिकेतील बटुक पटेल (बोमन इराणी) आणि आखरी पास्ता (चंकी पांडे) या दोन व्यक्तिरेखा आपल्याला नव्याने भेटतात. बटुकने सांभाळलेल्या ऊर्जा नागरे (जॅकी श्रॉफ) या मुंबईतील डॉनच्या तीन मुली गंगा (जॅकलिन), जमुना (लिझा हेडन) आणि सरस्वती (नर्गिस फाखरी). तिघींचा विवाह होऊ शकत नाही. पण तरीही या मुलींना पटवण्यात सँडी (अक्षय कुमार), टेडी (रितेश देशमुख) आणि बंटी (अभिषेक बच्चन) हे तिघेही यशस्वी होतात. मात्र बटुकला पटवण्यासाठी हे तिघे एक पायाने अधू, एक मुका आणि एक आंधळा अशा रूपात त्यांच्या घरात दाखल होतात. या तिघांना मात देत ऊर्जाच्या मुलींचं लग्न आपल्या मुलांशी व्हावं म्हणून बटुक त्यांनाही या घरात बोलावतो. आणि मग गैरसमजुतीची एकच मालिका सुरू होते. ‘हाऊसफुल्ल २’ चित्रपटांचे संवाद साजिद-फरहाद जोडीनेच लिहिले होते. इथे त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.
‘ये मेरी सेब की आँख है..’ (अ‍ॅप्पल आय) अशी टुकार वाक्यं तेही हे विनोदी पंचेस देण्याची जबाबदारी कोणाची तर.. जॅकलिन, लिझा आणि नर्गिस यांची. केवळ चांगलं दिसण्यापलीकडे ज्यांची उडीच जात नाही अशा या इंग्रजाळलेल्या नायिकांच्या तोंडून विनोदी पंचेस ऐकायला मिळतील अशी कल्पनाही करणं जिथे अवघड, तिथे दिग्दर्शक जोडीने त्यांना ते करायला आणि प्रेक्षकांना सहन करायला भाग पाडलं आहे. अक्षय कुमार, रितेश आणि अभिषेक ही त्रिमूर्तीही या वेळी फिकी पडली आहे. त्यातल्या त्यात अक्षयला जडलेला दुभंग व्यक्तिमत्त्वाचा आजार आणि त्यामुळे कधी सँडी कधी सुंडी अशी दुहेरी भूमिका त्याने चांगली रंगवली आहे. पण रितेश आणि अभिषेकच्या वाटय़ाला विनोदी संवादही फारसे नसल्याने चित्रपट खळखळून हसायला लावतो असेही होत नाही. अभिषेकचं ‘बच्चन’ असणं चित्रपटात खुबीने वापरून घेतलं आहे. रितेशने सराईतपणे आपली भूमिका पार पाडली आहे. जॅकी श्रॉफचा ऊर्जा नागरे म्हणून झालेला मराठमोळा प्रवेश सुखावणारा आहे. मात्र त्याचीही व्यक्तिरेखा धड पुढे रंगवलेली नसल्याने त्याचीही भूमिका वाया घालवली आहे. एकूणच दोन-चार प्रसंग वगळता बिनडोक गर्दी जास्त झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाऊसफुल्ल ३
निर्मिती – साजिद नाडियादवाला
दिग्दर्शन – साजिद-फरहाद
कलाकार – अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, लिझा हेडन, जॅकलिन फर्नाडिस, नर्गिस फाखरी, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housefull 3 movie review
First published on: 05-06-2016 at 01:46 IST