बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सलमान खान हे खूप मोठे नाव आहे. सलमानचा चित्रपट म्हटला की १५०-२०० कोटींचा गल्ला सहज कमवणार असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून अॅक्शन- थ्रीलर चित्रपटांकडे त्याचा जास्त कल वाढला आहे. या चित्रपटांसाठी तो विशेष मेहनत घेत असतो. त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून अनेक अभिनेत्यांना त्याचा हेवा वाटतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘दबंग’, ‘सुलतान’ आणि आता ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांमधील लूकसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याचे फिटनेस सिक्रेट्स सांगितले.
‘चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी जवळपास तीन महिने तो जिममध्ये कठोर मेहनत घेत होता. आल्प्स येथील बर्फाळ ठिकाणी काही साहसदृश्यांचे शूटिंग करायचे असल्याने तसे प्रशिक्षणही त्याला देण्यात आले. इतकेच नाही तर बर्फाळ प्रदेशात शूटिंग करतानाही दररोज सलमानला प्रशिक्षण दिले जात होते. तो सायकल चालवत सेटवर पोहोचत असे आणि इतक्या थंड हवामानाच्या ठिकाणी सायकल चालवणे सोपे नव्हते. दररोज तो दहा किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरापर्यंत सायकल चालवत येत होता. त्याचा डाएटसुद्धा ठरलेला होता आणि आपण काय खावे आणि काय नाही यावर त्याचे कमालीचे नियंत्रण आहे. फक्त ग्रीसमध्ये शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्याने डाएट प्लॅनकडे दुर्लक्ष करत जेवणावर मनसोक्त ताव मारला,’ असे त्याने सांगितले.
वाचा : श्रीदेवीच्या ‘या’ गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये आलिया मुख्य भूमिकेत
सलमान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.