करोना विषाणूची भीती आता संपूर्ण जगात पसरली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यात लहान मुले आणि वयस्क व्यक्ती यांच्याही आरोग्याकडे नीट लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येक जण घरातील व्यक्तींची काळजी घेताना दिसून येत आहे. यामध्येच अभिनेता राकेश रोशनदेखील फीट आणि हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा जीममधील एक व्हिडीओ हृतिकने शेअर केला असून यात वर्कआऊटमध्ये राकेश रोशन, हृतिकला मागे टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

राकेश रोशन यांनी वयाची साठी पार केली आहे. मात्र आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. लॉकडाउन असल्यामुळे सध्या सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही घरीच आहेत. मात्र या काळात ते त्यांचा डेली रुटीन अजिबात चुकवत नाहीयेत. खासकरुन ते त्यांचा वर्कआऊट काटेकोर पद्धतीने पाळत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच सध्या जीम बंद असल्यामुळे अभिनेता राकेश रोशनदेखील घरीच वर्कआऊट करत आहेत. खरंतर हृतिक फिटनेसफ्रिक आहे. मात्र वडिलांची वर्कआऊट करण्याची पद्धत पाहून तोदेखील थक्क झाला आहे. त्यामुळे वर्कआऊटच्या बाबतीत राकेश रोशन ,हृतिकला टक्कर देत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटत आहे.

‘उफ! हे माझे वडील आहेत…कधीच हार मानत नाहीत. या अशा काळात  अशाच इच्छाशक्तीची गरज असते. यावर्षी ते ७१ वा वाढदिवस साजरा करतील. मात्र या वयातदेखील ते २ तास रोज वर्कआऊट करतात. विशेष म्हणजे नुकतेच ते आजारातून बरे झाले आहेत. कर्करोगासारख्या आजारावर त्यांनी मात केली आहे. मला वाटतंय त्या करोना विषाणूनेदेखील आता यांना घाबरायला हवं’, असं कॅप्शन हृतिकने व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.

दरम्यान, हृतिकने वडिलांच्या वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केल्यापासून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहे.